महाराष्ट्र
चंद्रपूर महानगरपालिकेच्या घंटागाडी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप
चंद्रपूर महानगरपालिकेपुढे घंटागाडी कामगारांनी आंदोलन सुरु केले आहे. 2015 पासूनची त्यांची किमान वेतनाची मागणी अद्यापही पूर्ण झालेली नाही. महानगरपालिका आणि शहरातील सर्वपक्षीय नेत्यांच्या हस्तक्षेपाने कामगारांना रुजू करण्यासाठी आश्वासन देण्यात आले होते.
परंतु 2015 पासून किमान वेतनाची मागणी पूर्ण करण्यात आलेली नाही. त्याकरिता घंटागाडी कामगारांनी बेमुदत कामबंद संप पुकारला आहे. जोपर्यंत किमान वेतन मिळत नाही, तोपर्यंत काम करणार नाही, अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.
कोरोना काळात जीवाची जोखीम असतानाही घंटागाडी कर्मचारी कर्तव्यावर कायम राहिले. तरीही पालिकेने दखल घेतली नाही. यामुळे हे आंदोलन सुरू झाले असून, शहरातील स्वच्छतेवर विपरीत परिणाम होणार आहे.