Pune Sinhagad News : सिंहगडवरील बेपत्ता तरुण अखेर सापडला! पाच दिवसांच्या शोधमोहीमेला यश; मात्र...
पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर फिरायला गेलेल्या गौतम गायकवाड या तरुणाचा गेल्या बुधवारी (20 ऑगस्ट) अचानक पत्ता लागेनासा झाला होता. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिस, हवेली पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथक त्याचा सातत्याने शोध घेत होते. अखेर रविवारी संध्याकाळच्या सुमारास त्याचा शोध लागला असून सध्या त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गौतम हा आपल्या साताऱ्यातील मित्रांसोबत किल्ल्यावर आला असताना तानाजी कड्यावरून पाय घसरल्याने दरीत पडल्याचे सांगण्यात आले होते. या घटनेनंतर पोलीस आणि स्थानिक पथकांनी मोठ्या प्रमाणावर शोधकार्य सुरू केले होते. दरम्यान, किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका तरुणाचा पळत व लपून जाण्याचा व्हिडिओ आढळला होता. त्यामुळे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले होते.
गौतमचा सीसीटीव्हीमधील व्हिडिओ समोर आल्यानंतर तरुणाने जाणूनबुजून बेपत्ता होण्याचा प्रयत्न केला का, असा संशय पोलिसांमध्ये व्यक्त केला जात होता. 24 वर्षीय गौतम गायकवाड या तरुणाबाबत अद्याप नेमके काय घडले याचा उलगडा झाला नसून पुढील तपास सुरू आहे.