'प्रदूषण काळात व्यायाम टाळा' मुंबई महापालिकेचा नागरिकांना आरोग्य सल्ला
मुंबईतील हवेचा गुणवत्ता स्तर 'वाईट' झाल्याने नागरिकांनी आरोग्यविषयक योग्य काळजी घेण्यासाठी मुंबई महापालिकेने नियमावली जाहीर केली आहे. मुंबईतील हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कठोर उपाययोजना सुरू केल्या आहेत.
मुंबई महापालिकेने बोरिवली आणि भायखळा येथील सर्व बांधकामांवर पूर्ण बंदी घातली आहे. यासोबतच, बांधकाम स्थळांसाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. पालिका प्रशासनाने नागरिकांसाठी आरोग्यविषयक सूचना देखील दिल्या आहेत. प्रदूषण नियंत्रणासाठी नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी, याची सुस्पष्ट मार्गदर्शिका पालिकेने जाहीर केली आहे.
प्रदूषण कालावधीत आरोग्यविषयक सल्ला
● वायुप्रदूषणाच्या कालावधीत फटाके फोडू नयेत.
● सिगारेट, बिडी आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करू नये.
● घरामध्ये स्वच्छता करताना झाडू मारण्याऐवजी ओल्या फडक्याचा वापर करावा.
● बंद घरामध्ये डासांच्या कॉइल, अगरबत्ती जाळणे टाळावे.
● निरोगी आहारासाठी फळे, भाज्या आणि पाणी इत्यादींचे सेवन करावे.
● श्वसनाचा त्रास, चक्कर येणे, खोकला, छातीत अस्वस्थता किंवा वेदना असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा अथवा नजीकच्या महानगरपालिका दवाखाना / रुग्णालयात जावे.
● प्रदूषण कालावधीत घराबाहेर जायचे असल्यास मुखपट्टीचा वापर करावा.