Beed Rain : बीड जिल्ह्यात पावसाचा कहर; जीप वाहून सहा जण अडकल्याची घटना
(Beed Rain) बीड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्या आणि नाले तुडुंब भरून वाहू लागले. त्यामुळे ग्रामीण भागात पूरस्थिती गंभीर बनली आहे. सिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत साबला कवडगाव परिसरात मध्यरात्री दोनच्या सुमारास एक जीप पाण्याच्या प्रवाहात अडकून वाहून गेल्याने मोठी खळबळ उडाली.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, जीपमध्ये सहा लोक होते. त्यापैकी तिघांनी वेळेवर वाहनातून बाहेर पडत जीव वाचवला. ते पाण्याच्या प्रवाहात वाहत जाऊन एका शेवरीच्या झाडावर चढले आणि तिथून मदतीसाठी ओरडू लागले. त्यानंतर ग्रामस्थांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.
संबंधित घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाईचे सहाय्यक पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने दोरीच्या साहाय्याने बचाव मोहीम सुरू केली. पहाटेपर्यंत मदतकार्य सुरू होते, परंतु जोरदार पाऊस, अंधार आणि पाण्याचा तीव्र प्रवाह यामुळे अडथळे निर्माण झाले. उर्वरित लोकांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरूच होते.
दरम्यान, परिसरात पाणी शिरल्याने काही घरांचे नुकसान झाले असून शेतजमिनी जलमय झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काळजीचे वातावरण आहे. नागरिक सतत नदी-नाल्यांच्या पातळीकडे लक्ष ठेवून आहेत.