Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाचा कहर; 635 विद्युत खांब कोसळले, 40 गावांचा वीजपुरवठा खंडित
(Chhatrapati Sambhajinagar ) गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने छत्रपती संभाजीनगर शहर आणि ग्रामीण भागात महावितरणच्या वीज पुरवठा यंत्रणेला जबरदस्त फटका बसला आहे. या पावसामुळे एकूण 635 विद्युत खांब कोसळले असून, 40 पेक्षा अधिक गावांमध्ये वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी मात्र युद्धपातळीवर काम करत अवघ्या एका दिवसात बहुतांश भागात वीजपुरवठा पुन्हा सुरळीत केला आहे.
शहर आणि ग्रामीण भागात मोठे नुकसान
महावितरणने दिलेल्या माहितीनुसार, शहर मंडळात उच्चदाब वाहिनीचे 11 आणि लघुदाब वाहिनीचे 30 खांब कोसळले. याशिवाय तीन वितरण रोहित्रांची हानी झाली. तर ग्रामीण भागात उच्चदाब वाहिनीचे 213 आणि लघुदाब वाहिनीचे 381 खांब कोसळले असून 21 रोहित्रे खराब झाली आहेत. या सर्व भागांमध्ये वीजपुरवठा थांबल्यामुळे नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागली.
शिऊर परिसरात मुसळधार पावसाने वीज यंत्रणा ठप्प
वैजापूर तालुक्यातील शिऊर परिसरात मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाने थैमान घातले. 33 केव्ही लोणी वाहिनीवर विजेचा प्रहार झाल्याने जरुल फाटा, खंडाळा आणि कोल्ही येथे पिन इन्सुलेटर खराब झाले. यामुळे शिऊर, लोणी आणि भादली उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद झाला होता.
जोरदार झालेल्या पावसात अनेक विद्युत खांब वाकले. महावितरणने तातडीने पर्यायी मार्गाने वीजपुरवठा सुरू केला असला तरी, मंगळवारी काही खांब सरळ करण्यात आले आणि काही ठिकाणी मात्र अजूनही वाकलेले खांब आणि लोंबकळलेल्या तारांची स्थिती 'जैसे थे'च आहे, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. पावसाने थोडी उसंत घेताच महावितरणाने देखभाल आणि दुरुस्तीचे काम सुरू केले. पर्यायी वाहिन्यांद्वारे रात्री 12 वाजेपर्यंत बहुतेक भागांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.