Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis : Almatti Dam : 'कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये'; मुख्यमंत्र्यांचे केंद्रीय मंत्र्यांना पत्र

कर्नाटक सरकारने कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणाची जलाशय पातळी 519.6 मीटरवरून 524.256 मीटरपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव दिला.
Published by :
Team Lokshahi
Published on

(Devendra Fadnavis) कर्नाटक सरकारने कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणाची जलाशय पातळी 519.6 मीटरवरून 524.256 मीटरपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव दिला असून, यामुळे महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर आणि कृष्णा खोऱ्यातील भागांना पूराचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांना पत्र लिहिले आहे.

या पत्रात फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की, धरणाची उंची वाढविल्यास बॅक वॉटरमुळे पुराचा धोका वाढेल. या पाण्याचा थेट परिणाम म्हणजे नद्यांच्या पात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचतो, ज्यामुळे पाणी वाहून नेण्याची क्षमता घटते. परिणामी, पुराचे पाणी ओसरायला उशीर होतो आणि पूरस्थिती अधिक तीव्र होते. गेल्या काही वर्षांत सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये वारंवार पूर येत असून त्याचा फटका शेकडो गावांतील नागरिकांना, शेतीला आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बसत आहे.

फडणवीस यांनी पत्रात उल्लेख केला की, महाराष्ट्र शासनाने अलमट्टीच्या पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य पूरस्थितीचा अभ्यास करण्यासाठी रुरकी येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोलॉजीकडे अभ्यास सोपविला आहे. हा अभ्यास सिम्युलेशन आणि हायड्रानॉमिक्स पद्धतीने करण्यात येणार आहे. परंतु, तोपर्यंत धरणाच्या उंचीबाबत कोणताही निर्णय घेणे अयोग्य ठरेल.

धरणाच्या उंची वाढीमुळे केवळ पूर धोका वाढणार नाही, तर हजारो नागरिकांचे जीवन, त्यांची मालमत्ता आणि शेतीही धोक्यात येणार असल्याने, कर्नाटक शासनाने हा निर्णय तात्काळ थांबवावा, असा ठाम आग्रह मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे धरला आहे. त्यांनी कृष्णा खोऱ्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारने मध्यस्थी करावी, अशीही मागणी केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com