पोलिस भरतीत हायटेक कॉपी फसली; मोबाईल मास्कची केली होती निर्मिती
सचिन चपळगावकर, पिंपरी चिंचवड | पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या पोलिस भरती एका उमेदवाराने चक्क हायटेक कॉपीची रणनीती आखली होती. मात्र ही रणनीती तपासणी अधिकार्य़ांनी हाणून पाडली. या घटनेत उमेदवार हॉल तिकीट विसरल्याचा बहाणा करून पसार झाला होता. मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत पोलिस शिपाई पदासाठी शुक्रवारी लेखी परीक्षा घेण्यात आली. सहा जिल्ह्यातील ४४४ केंद्रावर घेतलेल्या या परीक्षेसाठी एक लाख ८९ हजार ७३२ उमेदवारांचे अर्ज आले होते.पिंपरी चिंचवडच्या हिंजवडी ब्लु रिडज शाळेत पोलिस भरती परीक्षेचे केंद्र होते. या केंद्रावर परीक्षा देणार्या एका उमेदवाराने चक्क हायटेक कॉपीचा डाव रचला होता. त्यानुसार तो परिक्षा केंद्रावरही पोहोचला.यावेळी परीक्षा केंद्रावरील तपासणीसमध्ये कॉपीची ही नवी धक्कादायक पद्धत समोर आली. ज्यामध्ये एका उमेदवाराने चक्क मोबाईल मास्कची निर्मिती केली होती.
या हायटेक कॉपीद्वारे हा उमेदवार कॉपी करून परीक्षा पास करणार होता. परिक्षा केंद्रावर उमेदवार पोहोचताच तपासणी करण्यात आली. यामध्ये उमेदवाराच्या N95 चा हा मास्क पोलिसांनी तपासला असता त्यात मोबाईल डिव्हाईस,सिम कार्ड, बॅटरी, चार्जिंग कनेक्टर अशा वस्तू म्हणजेच मोबाईलची बॉडी वगळता ज्या वस्तू असतात त्या सर्व त्यात होत्या. त्यामुळे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये कॉपी करण्यासाठीचा त्याचा हा डाव पोलिसांनी मात्र हाणून पाडला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.