मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या भरावासाठी बेकायदा गौण खनिज उत्खनन

मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या भरावासाठी बेकायदा गौण खनिज उत्खनन

महामार्ग उभारणाऱ्या मोंटो कार्लो कंपनीला महसूल विभागाचा दंड
Published by  :
shweta walge

प्रविण बाबरे; पालघर जिल्ह्यात काम सुरू असलेल्या मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या भरावासाठी गौण खनिजाचे मोठ्या प्रमाणात बेकायदा उत्खनन केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी महसूल विभागाकडून महामार्गाची ठेकेदार कंपनी आणि जमीन मालकांच्या नावे दंडाच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. मात्र या कारवाईत बेकायदा गौण खनिज उत्खनन करणारे नामनिराळे राहीले असल्याने गरीब शेतकर्‍यांची फसगत झाली आहे.

पालघर जिल्ह्यात मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गाचे काम सुरू आहे. या महामार्गाच्या मासवण ते गंजाड या २७ किमीच्या भागाचे काम मोंटे कार्लो प्रा.ली. या ठेकेदार कंपनीकडून सुरू आहे. कंपनीमार्फत महामार्गाच्या भरावासाठी लागणार्‍या माती आणि मुरूम सारख्या गौणखनिजाचे पुरवठा कण्याचे काम परीसरातीलच काही स्थानिक व्यक्तींनी घेतले आहे. मात्र हजारो ब्रास गौणखनिजाचे उत्खनन करताना जमीनीच्या खातेदारांसोबत करारपत्र आणि संमतीपत्र न बनविता त्यांना विविध आमिषे दाखवून तसेच त्यांच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेत अतिशय तुटपुंजी रक्कम त्यांना देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गौणखनिज उत्खननाकरीता पालघर महसूल विभागाची आवश्यक परवानगी न घेता व स्वामित्वधनाची रक्कम देखील भरली नसल्याचे समोर आले आहे.

पालघर जिल्ह्यात मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या भरावासाठी नजीकच्या गावातील माती व मुरूम या गौणखनिजाचे मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू आहे. राजकीय पक्षांची संबंधित काही स्थानिक व्यक्तींकडून या गौणखनिजाचे ठेकेदार कंपनीला पुरवठा करण्यात येतो. यासाठी महसूल विभागाच्या आवश्यक परवानग्या,जमिनीच्या खातेदारांसोबतचा करारनामा, संमतीपत्र आणि स्वामित्वधन भरण्याची सर्व कामे ही संबंधित व्यक्तींकडून करण्यात येतात. मात्र अनेक ठिकाणी यापैकी कोणत्याही प्रकारच्या परवानग्या न घेताच परस्पर गौणखनिज उत्खनन केल्याचे प्रकार घडले आहेत. यामध्ये बेकायदा उत्खनन करणारे व्यक्ती बाजूला राहून दंड भरण्याच्या नोटीसा जमिनीचे खातेदार आणि ठेकेदार कंपनी यांना बजावण्यात आल्याने गरीब आदीवासी शेतकर्‍यांची मोठी फसगत झाली आहे.

पालघर तालुक्यातील मौजे आकेगव्हाण येथील गट क्र.४४/४ मधून ७४७ ब्रास बेकायदा उत्खनन केल्याप्रकरणी पालघर महसूल विभागाकडून मोंटे कार्लो प्रा.ली. व जमीन मालक केरू महादू तांडेल यांना ४२ लाख १६ हजार ८१५ रुपये तर मौजे नानिवली (घोडीचा पाडा) येथील गट क्र.१३२ मधून तब्बल १५६९९ ब्रास माती व मुरूमाचे बेकायदा उत्खनन केल्याप्रकरणी मोंटे कार्लो प्रा.ली.व जमीन मालक राजाराम धाकट्या डौला यांच्या नावे ८ कोटी ८६ लाख २० हजार ८५५ रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com