Wardha
WardhaTeam Lokshahi

वर्ध्यात सात जनावरे लम्पीग्रस्त तर एका जनावरांचा मृत्यू

प्रसार थांबविण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना लसीकरणाला सुरुवात
Published by :
shamal ghanekar

भूपेश बारंगे|वर्धा : जिल्ह्यात सात जनावरांमध्ये लम्पी चर्मरोग सदृष्य रोग लक्षणे आढळून आली आहे. जिल्ह्यात या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी लक्षणे आढळलेल्या गावांसह परिसर बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी याबाबत आदेश निर्गमित केले आहे.

आर्वी शहर व या तालुक्यातील हिवरा (तांडा), सावळपूर आष्टी तालुक्यातील वडाळा या गावांमध्ये लम्पी सदुष्य लक्षणे असलेली जनावरे आढळून आली आहे. यात एका जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ही गावे बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहे.

हिवरा (तांडा) या गावालगतच्या ५ किलोमीटर परिसरात असलेली आर्वी तालुक्यातील हर्रासी, पाचोड, बेल्हारा (तांडा), हिवरा, जामखुटा, राजणी ही गावे सतर्कता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहे.

आर्वी शहरापासून ५ किलोमीटर परिसरातील खडकी, शिरपूर, पिंपळा (पू), वाढोणा (पू), मांडला, धनोडी (नांदपूर), सावळापूरच्या परिसरातील अंतरडोह, जाम (पू), जाम, लहादेवी, पांजरा, हरदोली, बाजारवाडा तसेच आष्टी तालुक्यातील वडाळा या गावाच्या परिसरातील बोरगाव, टूमणी, झाडगाव, वर्धपूर, सत्तरपूर ही गावे देखील सतर्कता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहे. या गावांमधील बाधित जनावरे वगळता इतर गोवर्गिय जनावरांचे प्रतिबंधात्मक लसीकरण तातडीने करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.

Wardha
वर्ध्यात गणपती विसर्जनात विघ्न, विसर्जनाला गेलेले तीन जणांचा बुडून मृत्यू

आर्वी आणि आष्टी तालुक्यातील संबंधित गावांमधील जनावरांना इतर कोणत्याही निरोगी भागात प्रवेशास प्रतिबंधित करण्यात आले आहे. बाधित आढळून आलेल्या जनावरांचे विलगीकरण करण्यात आले आहे. या जनावरांना चारा व पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्याबाबत संबंधित नगर पंचायत व ग्रामपंचायतींना करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. बाधित जनावरांच्या संपर्कातील वैरण, गवत किंवा अन्य साहित्य, प्राण्याचे शव, कातडी यास इतरत्र प्रवेश आणि वाहतुकीस मनाई राहील, असे जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नमुद करण्यात आले आहे.

उपाययोजनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कारवाई

जनावरांमधील लम्पी या चर्मरोगाचा प्रादूर्भाव होऊ नये यासाठी वेळोवेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना निर्गमित करण्यात आल्या आहे. या उपाययोजनांचे उल्लंघन करणाऱ्या आणि त्याप्रमाणे सुसंगत कृती न करणाऱ्या, कायदयाच्या अंमलबजावणीमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या पशुपालक, व्यक्ती, संस्था यांच्या विरुध्द प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल केले जातील. याबाबतच्या कायदेशिर कारवाईसाठी ग्राम पंचायत व नगर परिषदांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

बाधित क्षेत्रसह 5 किलोमीटर भागातील गावात लसीकरण

जिल्ह्यात नुकताच लम्पी आजाराने प्रवेश केला असून यात काही गावामध्ये बाधित जनावरे आढळून आले आहे. या भागातील गावात लसीकरण केले जात असून शहरी भागाजवळील पाच किलोमीटर अंतरावर गावात सकाळपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे.

पशुपालक चिंतेत...

एकीकडे अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे मोठं नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी संकटात असताना त्यात लम्पी आजाराने डोकं वर काढल्याने यात भर पडली आहे. या आजाराने जनावरे मृत्युमुखी पडत असल्याने पशुपालक चिंतेत पडले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com