Koyna Dam : कोयना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ; 54.49 टीएमसी जलसाठा
( Koyna Dam ) कोयना पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणात अवघ्या एका महिन्यात विक्रमी पाणीसाठा जमा झाला आहे. 30 जून रोजी सायंकाळपर्यंत धरणात 54.49 टीएमसी पाणीसाठा झाला असून, धरणाची अर्धी क्षमता जूनमध्येच भरल्याचा हा पहिलाच ऐतिहासिक प्रसंग ठरला आहे.
धरणाचे पावसाळी वर्ष 1 जूनपासून सुरू झाले असून, त्यावेळी साठा 22.42 टीएमसी होता. एक महिन्याच्या कालावधीत 33.65 टीएमसीने वाढ होऊन साठा अर्ध्या क्षमतेवर पोहोचला आहे. धरणाची एकूण क्षमता 105 टीएमसी आहे. मागील वर्षी याच दिवशी हा साठा केवळ 19.79 टीएमसी होता.
यावर्षी साठा सरासरीच्या तुलनेत तब्बल 34.37 टीएमसीने जास्त आहे. पाण्याची मागणी कमी असल्यामुळे आणि पावसाळा अजून बाकी असल्याने धरण प्रशासनास पूरस्थिती टाळण्याचे आव्हान आहे. गेल्या 24 तासांत कोयना परिसरात 98.33मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये कोयनानगर 1575 मिमी, नवजा 1354 मिमी आणि महाबळेश्वर 1469 मिमी आहेत.