Solapur BJP: सोलापुरात भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; दोन गटांतील संघर्षात माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं
महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपताच सोलापूरमध्ये भाजपच्या दोन गटांत मोठा राडा झाला. रविवारी पेठ भागातील प्रभाग क्रमांक दोनमध्ये उमेदवारी न मिळाल्याच्या रागातून भाजपच्याच एका गटाने माजी नगरसेवक शंकर शिंदे यांचे संपर्क कार्यालय फोडले. या खळबळजनक घटनेमुळे जोशी गल्ली परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये भाजपचे दोन प्रभावी गट आहेत - शिंदे गट आणि सर्वदे गट. या प्रभागातून उमेदवारी मिळवण्यासाठी दोन्ही गटांनी जोरदार ताकद लावली होती. मात्र, भाजपने शिंदे गटातील शालन शिंदे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली. यामुळे सर्वदे गट प्रचंड आक्रमक झाला आणि उमेदवारी नाकारल्या गेल्याच्या रागातून कार्यकर्त्यांनी शंकर शिंदे यांच्या संपर्क कार्यालयावर हल्ला चढवून तोडफोड केली.
घटनास्थळी पोलिसांची तत्काळ कारवाई झाली. तोडफोडीची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. खबरदारीचा उपाय म्हणून दंगा नियंत्रण पथक तैनात केले असून, वरिष्ठ अधिकारी स्वतः लक्ष ठेवत आहेत. परिसरात गस्ती वाढवण्यात आल्या आहेत.
भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून, उमेदवारी नाकारल्यानंतर बंडखोर किंवा इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजी आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत नुकतीच संपली तरी असे प्रकार निवडणूक वातावरण ढवळून निघत आहेत. भाजप नेतृत्वाने याबाबत प्रतिक्रिया द्यावी, अशी मागणी होत आहे.
