महाराष्ट्र
जेजुरीला दर्शनाला जातायं! तर थांबा, आधी ही बातमी वाचाच
दीड महिना खंडोबाचा मंदिराचा गाभारा दर्शनासाठी बंद
अमोल धर्माधिकारी | पुणे : महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडामधील मुख्य स्वयंभू लिंगाचा व घोड्याचा गाभारा उद्यापासून दुरुस्तीच्या कामासाठी दीड महिना बंद राहणार आहे. या काळात गडावर आलेल्या भाविकांना कासवापासून देवाचे दर्शन घ्यावे लागणार असून दोन्ही गाभाऱ्यात जाता येणार नाही.
गडामध्ये कुलधर्म कुलाचार करण्यास कोणतीही अडचण नाही. ५ ऑक्टोबरपर्यंत गाभारा दुरूस्तीचे काम चालणार आहे. जेजुरीचा ऐतिहासिक खंडोबा गड जतन करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे विकास आराखड्याची कामे सुरू आहे. पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक त्या दुरुस्त्या व उपाययोजना केल्या जात आहेत. यासाठी सुमारे १०७ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर झाला आहे. गडावर विविध विकास कामे वेगात सुरू आहे.