सांगली पोलीस ठाण्याच्या आवारातूनच बालकाचे अपहरण

सांगली पोलीस ठाण्याच्या आवारातूनच बालकाचे अपहरण

सातारा येथे रेल्वेत चौघांना अटक

संजय देसाई | सांगली : शहर पोलीस ठाण्याच्या आवारातून तीन वर्षाच्या बालकाचे अपहरण केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी मुलाच्या आईने फिर्याद दिल्यानंतर सांगली शहर पोलिसांनी सातारा येथे रेल्वेतून जाणाऱ्या चौघांना अटक करत अपहरण केलेल्या बालकाचे सुटका केली. याप्रकरणी रेशमीदेवी श्यामसुंदर रविदास, बुधन उर्फ औकात सत्येंद्र रविदास, मिथुन जय कुमार सत्येंद्रदास, बसने देवी सत्येंद्रदास हे सर्व राहणार बिहारचे या चौघांना सांगली शहर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी वैशाली शामसुंदर रविदास यांनी फिर्याद दिली होती.

फिर्यादी वैशाली यांच्या पतीची पहिली पत्नी रेशमीदेवी आहे. वैशाली आणि रेशमी देवी यांच्यात भांडण झाल्यानंतर रेशमी देवी विरुद्ध तक्रार देण्यासाठी वैशाली ही मुलगा सुजित वय 3 वर्ष याला घेऊन सांगली शहर पोलीस ठाण्यात आली होती. वैशाली ही तक्रार देण्यासाठी वरती गेले असताना तिचा मुलगा सुजित हा आवारातच खेळत होता. तेव्हा वैशालीने पती शामसुंदरला पळून नेल्याचा राग मनात धरून रेशमीदेवी, बुधन आणि मिथुन कुमार आई बसनीदेवी या चौघांनी तीन वर्षाच्या सुजितचे अपहरण केले. काही वेळाने मुलगा सुजित कुठे दिसत नसल्याचे पाहून वैशालीने सर्वत्र शोध घेतला परंतु मुलगा कोठेच आढळला नाही. तसेच रेशमीदेवी आणि अन्य तिघेजण सापडले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध मुलाचे अपहरण केल्याची फिर्याद वैशाली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात केली.

पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवली. सांगली व मिरज रेल्वे स्थानकावर शोध घेत असताना चौघेजण सुजितला घेऊन महाराष्ट्र एक्सप्रेसने निघाल्याचे समजले. त्यामुळे पथक तातडीने कराड आणि साताराकडे रवाना झाले. रेल्वे सातारा येथे येताच रेल्वे पोलिसांच्या मदतीने शहर पोलिसांनी या चौघांना ताब्यात घेत सुजितची सुटका केली. अटकेतील चौघांना शहर पोलीस ठाण्यात आणले आणि त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com