Kolhapur Panchaganga River : कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल; 57 बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत
(Kolhapur Panchaganga River ) काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती यातच आता पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यभरात पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने विविध जिल्ह्यांत पावसाचा इशारा दिला आहे.अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे नदी, नाले तुडुंब भरुन वाहत आहेत.
राज्यातील बहुतांश भागात पावसाने दमदार हजेरी लावली असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच कोल्हापूरच्या धरणक्षेत्रात पावसाची संततधार सुरू असून पंचगंगा नदीची पाणी पातळी इशारा पातळीकडे वाटचाल करत आहे. पंचगंगेची पाणीपातळी 35 फुट 9 इंचावर पोहचली असून जिल्ह्यातील सगळ्याच नद्यांना पूर आला आहे.
57 बंधारे पाण्याखाली गेली आहेत.पंचगंगा नदी यावर्षीच्या पावसाळ्यात चौथ्यांदा पात्राबाहेर गेली आहे. राधानगरी धरणासह सह दूधगंगा, तुळशी , कुंभी, वारणा, पाटगाव धरणातून विसर्ग सुरू आहे. राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.