कुंभार्ली घाट बनला मृत्यूचा सापळा
निसार शेख | कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा कुंभार्ली घाट. कोकण व पश्चिम महाराष्ट्र यांचे एक वेगळच नातं कुंभार्ली घाट अनेकवर्षं जपत आहे. 18 किलोमीटर अंतराचा हा घाट नागमोडी वळणाचा आहे. घाटात आतापर्यंत अनेक अपघात झाले असूण या सर्व अपघातांना घाटातील रस्ते जबाबदार आहेत.
आज रस्त्याची अवस्था फार बिकट झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे. त्यातच रत्नागिरीतील आंबा घाटातून अवजड वाहनांची वाहतुक बंद असल्यामुळे कुंभार्ली घाटातून अवजड वाहनांची वाहतूक अहोरात्र सुरू आहे. जवळपास 40 टनच्या दहा चाकी अवजड वाहने घाटातून वाहतूक करीत असल्यामुळे घाटातील अनेक रस्ते खचले आहेत. त्यामुळे आठवड्यातुन दोन तीन वेळा हा घाट बंद पडतो त्यामुळे आठ आठ तास घाटातील वाहतूक बंद राहते याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग घाटातील खड्डे बुजवित असतात. मात्र मोठ्या मोठ्या गाड्याची वाहतूक 24 तास सुरू असल्यामुळे बुजविलेले खड्डे चार दिवसांत पुन्हा उखडता. घाटातील रस्त्याची डागडुजी करण्यासाठी घाट चार दिवस बंद ठेवावा लागेल, मात्र पर्यायी मार्ग नसल्यामुळे चार दिवस घाट बंद राहिल्यास कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील आयात निर्यात बंद राहील आणि त्याचा सर्वाधिक आर्थिक फटका कोकणावर होऊ शकतो, त्यामुळे रस्त्याची डागडुजी कशी करावी असा प्रश्न सार्वजनिक बांधकाम विभागासमोर पडला आहे. मात्र या घाटातील रस्त्यामुळे वाहन चालक व प्रवासी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच लक्ष देऊन घाटातील रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी वाहनचालक व प्रवासी यांच्यातुन होत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यानी नकार दिला आहे.