Ladki Bahin Yojana : छत्रपती संभाजीनगरमध्ये लाडकी बहीण अर्जाची पडताळणी; 20 हजार अर्जदार वयोमर्यादेबाहेर असल्याची माहिती
(Ladki Bahin Yojana )लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीला एक वर्ष पूर्ण होत असताना राज्य सरकारने पात्रतेचे नियम काटेकोरपणे लागू करण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला सर्व पात्र महिलांना मानधन देण्याची घोषणा झाल्यानंतर मोठ्या संख्येने अर्ज आले. मात्र पडताळणीदरम्यान अनेक अनियमितता उघडकीस आल्याने मोठ्या प्रमाणात अर्ज नाकारले जात आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तपासणीत 20 हजार महिला वयोमर्यादेबाहेर असल्याचे समोर आले. यात काही अर्जदार 20 वर्षांखालील असून, काही 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आहेत. तसेच 84 हजार अर्ज हे एकाच घरातील तीन किंवा अधिक महिलांचे असल्याचे आढळले. नियमांनुसार अशा प्रकरणांना योजनेतून वगळण्यात आले आहे.
या प्रक्रियेमुळे राज्यभरात एकूण 1 लाख 4 हजार महिलांचा मानधनाचा हक्क रद्द झाला आहे. संबंधित बहिणींचे दरमहा मिळणारे 1500 रुपयांचे मानधन तात्काळ थांबवण्यात आले आहे. अंगणवाडी सेविकांकडून अजूनही छाननी सुरू असून, आतापर्यंत 435 महिलांनी स्वतःहून लाभ न घेण्याचे पत्र दिले आहे. सध्या राज्यातील 26 लाख संशयित लाभार्थ्यांची पडताळणी सुरू असून, येत्या काळात इतर जिल्ह्यांतही मोठी कपात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.