जाणून घ्या ‘या’ महत्वाच्या ज्योतिर्लिंग देवस्थानाची माहिती
भगवान शंकराचे पवित्र जपणाऱ्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक हिंदू तीर्थस्थान म्हणजे नाशिक जवळील त्रंबकेश्वर. या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. याच तीन आखाड्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी अर्ध सिंहस्थ कुंभमेळा भरतो. गोदावरी नदीचा उगम येथेच झाला.
त्र्यंबकेश्वरचे मंदिर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. पुरातन काळात बनलेले हे मंदिर आहे. त्र्यंबकेश्वर येथे असलेलं मंदिर हे काळ्या शिळेपासून बनलेलं आहे. मंदिराची रचना अद्वितीय तसेच आकर्षक आहे. मंदिराच्या आतमध्ये एक गर्भगृह आहे आणि त्या गर्भगृहामध्ये शिवलिंग आहे. मंदिराच्या पूर्वेला आपल्याला एक चौकोनी मंडप पाहायला मिळतो आणि मंदिराच्या चहूकडे चार दरवाजे आहेत. पश्चिमेला असलेला दरवाजा हा फक्त विशेष कार्यप्रसंगी उघडला जातो, बाकी दिवस भक्तगण बाकी तीन दरवाज्यांतून प्रवेश करुन ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊ शकतात.
गोदावरी नदीच्या उगमाशी त्र्यंबकेश्वर, वाकी नदीच्या उगमाशेजारचे त्रिंगलवाडीतले शिवालय, धारणा नदीच्या उगमाशेजारचे -तऱ्हेळे येथे, बाम नदीच्या उगमाशेजारचे – बेलगावला, कडवा नदीच्या उगमाशेजारचे – टाकेदला, प्रवरा नदीच्या उगमाशेजारी – रतनवाडीतील अमृतेश्वर, मुळाउगमस्थानी असलेल्या – हरिश्चंद्रगडावरील हरिश्चंद्रेश्वर, पुष्पावतीजवळ – खिरेश्वरातील नागेश्वर, कुकडीजवळ्च्या – पूरमधील कुकडेश्वर, मीना नदीच्या उगमाशेजारच्या – पारुंडेतील ब्रह्मनाथ, घोड नदीच्या उगमस्थानी – वचपे गावातील सिद्धेश्वर आणि भीमा नदीजवळचे -भवरगिरी. ही सर्व मंदिरे शिल्प सौंदर्याने नटलेली आहेत, कोरीव कलेने सजलेली आहेत.
नानासाहेब पेशवे यांनी इ.स. 1755-1786 या कालावधीत हेमांडपंती स्थापत्यशैलीत श्री त्र्यंबकेश्वर मंदिर नव्याने बांधले. भारत सरकारने या मंदिराला दिनांक 30 एप्रिल इ.स. 1941 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.
ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र असल्याने तेथे बाराही महिने भाविकांचा मोठा राबता असतो. श्रावण महिन्यात ही गर्दी अधिकच वाढते. श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरमध्ये लक्षावधी भाविक हजेरी लावतात. श्रावण महिन्यातील पहिल्या तीन सोमवारी त्र्यंबकेश्वरास भाविकांची गर्दी वाढत जाते. भारतात फक्त त्र्यंबकेश्वर या ठिकाणीच नारायण नागबली, त्रिपिंडी, कालसर्प शांती, विष्णुबली, उत्तरक्रिया, लघुरुद्र, जननशांती, सिंहस्थसिन्हास्त विधी, हे धार्मिक विधी केले जातात.