फडणवीसांनी केलेल्या आरोपांना सदावर्तेकडून दुजोरा; म्हणाले, कट रचला गेला...
राज्यात सध्या राजकीय घडामोडी प्रचंड तीव्र झाल्या आहेत. काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात बोलत असताना मागील महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले होते. त्यावरून राजकीय वर्तुळात एकच गदारोळ चालू झाला होता. परंतु, फडणवीसांच्या दाव्याला अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दुजोरा दिला आहे. यावेळी बोलत असताना त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
नेमकं काय म्हणाले सदावर्ते?
माध्यमांशी बोलताना सदावर्ते म्हणाले की, आंदोलकांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केला होता, त्यावेळी मला चौकशीसाठी बोलावून घेतलं होतं. डीसीपी निलोत्पल यांनी मला रात्री बोलावून माझ्याशी पवारांच्या हल्ल्यासंदर्भात चर्चा कमी तर नागपूर RSS आणि फडणवीस यांच्या भेटीगाठीसंदर्भात प्रश्न विचारले होते. काहीही करून त्यांना माझ्या तोंडतून वेगळंच काही वदवून घ्यायचं होतं, हा कट रचला गेला होता, असा दावा गुणरत्न सदावर्ते यांनी केला.
पुढे ते म्हणाले की, दिलीप वळसे पाटील, विश्वास नांगरे पाटील, संजय रांडे यांच्या तोंडून त्या वेळी कट असा शब्द निघाला होता. दिलीप वळसे पाटील, अजित दादा, नांगरे पाटील यांची नार्को चाचणी करा. या पुढाऱ्यांची बैठक झाली होती, त्याला संजय पांडे उपस्थित होते. या कटात आरएसएस व फडणवीस यांनाच अडकवायचं होतं, असा दावा सदावर्ते यांनी केला आहे.
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
माझ्यावर काहीही करुन गुन्हा दाखल झाला पाहिजे, मला अटक करायचा पूर्ण प्रयत्न महाविकास आघाडीच्या काळात करण्यात आला. हे शब्द योग्य आहेत की नाहीत मला माहिती नाही. पण याची सुपारीच तत्कालीन मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांना दिली होती. पण, त्यांचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. या संदर्भातील काही माहिती आमच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा माहिती आहे, असेही वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केले आहे.