राज्यात विधानसभा निवडणूक नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता; मुख्यमंत्री शिंदेंचे संकेत
राज्य विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होईल. साधारण दोन टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकीसाठी आचारसंहिता दसऱ्यानंतर लागू होईल, असे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दिले.
गणेशोत्सवानिमित्त माध्यमांबरोबर झालेल्या अनौपचारिक संवादात मुख्यमंत्री शिंदे यांनी सरकारच्या दोन वर्षांच्या कामगिरीवर जनता खूश असून त्याचे प्रत्यंतर विधानसभा निवडणुकीत नक्की दिसेल असा आशावाद व्यक्त केला. निवडणुकीसाठी महायुती सज्ज असून लोकसभा निवडणुकीतील यश आणि जिंकण्याची क्षमता या दोन निकषांवर महायुतीचे जागावाटप होत असल्याचे ते म्हणाले.
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेसह युवा प्रशिक्षण, लाडका भाऊ योजनांसाठी पुरेशा निधीची तरतूद असून त्यांचा अन्य विकासकामांवर कोणताही परिणाम होणार नाही. मात्र, या योजनांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने विरोधकांमध्ये अस्वस्थता पसरली असून त्यातूनच अपप्रचार विरोधकांनी सुरू केल्याचा आरोपही शिंदे यांनी केला.