Babanrao Lonikar
Babanrao Lonikar

Saamana Editorial : Babanrao Lonikar : बबनराव, तुमच्या आडनावात 'लोणी' असले तरी... 'सामना'तून टीकास्त्र

( Babanrao Lonikar ) भाजपचे परतूरचे आमदार बबनराव लोणीकर यांची सोशल मीडियावर सरकारला ट्रोल करणाऱ्यांवर टीका करताना जीभ घसरली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

( Babanrao Lonikar ) भाजपचे परतूरचे आमदार बबनराव लोणीकर यांची सोशल मीडियावर सरकारला ट्रोल करणाऱ्यांवर टीका करताना जीभ घसरली आहे. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता सामनातून टीका करण्यात आली आहे.

सामनातून म्हटले आहे की, सत्तेचे आणि श्रीमंतीच्या लोण्याचे अनेकांना अजीर्ण होते. त्यातले एक भाजपचे बबन लोणीकर. अशा असंख्य मस्तवाल लोण्यांच्या गोळ्यांनी भाजप तरारून फुगला आहे. भाजपचे आमदार बबन लोणीकर हे भाजपच्या संस्कृतीस स्मरून सामान्य जनता व शेतकऱ्यांना जे म्हणाले ते अमानुष आहे. लोणीकर गोरगरीब जनतेला म्हणाले, “तुमच्या अंगावरचे कपडे, तुमच्या बापाला पेरणीसाठी सहा हजार रुपये मोदींनी दिले. तुमच्या आईचा पगार मी सुरू केला. ‘लाडकी बहीण’ योजनेंतर्गत आयाबहिणींच्या नावावर पैसे आमच्या सरकारने जमा केले आणि तरीही तुम्ही आमच्याच विरोधात बोलता!’’ मराठवाड्यातील परतूर तालुक्यातील वाटूर गावात ‘हर घर सोलर’ या योजनेचे उद्घाटन करताना लोणीकर यांनी गावकऱ्यांना ‘सत्तेचे डोस’ पाजले. तुम्ही एका सरकारी योजनेचे उद्घाटन करायला आला होतात तर ते करायचे, त्या योजनेचे लाभ आणि इतर जनहिताच्या गोष्टी सांगायच्या आणि मोकळे व्हायचे. मात्र भाजपच्या मंडळींना या सर्व योजना म्हणजे त्यांच्याच खासगी जहागिऱ्या वाटू लागल्या आहेत. त्यातूनच ‘‘तुझ्या बापाला मोदींनी पेरणीसाठी सहा हजार रुपये दिले,’’ अशी मस्तवालपणाची भाषा त्यांच्या तोंडातून बाहेर पडू लागली आहे.

लाडक्या बहिणींची मते यांना विधानसभा निवडणुकीत गोड वाटली, पण सत्ता मिळाल्यावर मात्र ते या योजनेचे 1500 रुपये उचकटून दाखवीत आहेत. जनतेच्या अंगावरचे कपडे, पायातील चप्पल-बूट आणि हातातील मोबाईल ही सगळी आमचीच कृपा असे सांगण्यापर्यंत या मंडळींची मजल गेली आहे. बबनराव, तुमच्या आडनावात ‘लोणी’ असले तरी सत्तेच्या उकळीने बहुधा ते करपले आहे. त्यामुळेच राज्यातील जनतेचा, मतदारांचा अपमान करणारी भाषा तुम्ही बिनधास्तपणे करीत आहात. मुख्यमंत्री फडणवीस आता यासंदर्भात काय करणार आहेत? ‘‘मी संबंधितांना समज दिली आहे,’’ असे नेहमीचे तुणतुणे ते वाजवतील. याआधीही त्यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री आणि पक्षातील बोलभांड नेते यांच्या वाचाळपणाबाबत त्यांनी हेच तुणतुणे वाजवले होते. तरीही लोणीकरांसारखे त्यांचे आमदार जनतेला सत्तेचा माज दाखवीतच आहेत. पंतप्रधान मोदी हे स्वतःला जनतेचा ‘प्रधान सेवक’ म्हणवून घेतात. मुख्यमंत्री फडणवीस हे स्वतःला ‘मोदींचे नम्र सेवक’ संबोधतात, पण त्यांच्या पक्षाची मंडळी मात्र स्वतःला ‘जनतेचे सावकार’ समजायला लागली आहेत. मागील 11 वर्षांत ब्रिटिश राजवटीचे देशी बियाणे आपल्या देशात जास्तच तरारले आहे. त्यातूनच कोणी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल अपशब्द काढतात, कोणी हिंदूंना भरपूर मुले पैदा करण्याचा सल्ला देतात, कोणी मोदींना विरोध करणाऱ्यांना पाकिस्तानात चालते होण्याचा आदेश देतात, तर कोणी स्वतःला ‘हिंदूंचा गब्बर’ म्हणत बेताल धरतात. आता या वाचाळवीरांमध्ये शेतकऱ्यांना सरकारकडून मिळणारे सहा हजार रुपये उचकटून दाखविणाऱ्या आमदार बबनराव लोणीकर यांची भर पडली आहे.

बबनराव, बळीराजाला सहा हजार रुपये तुम्ही, तुमचे मुख्यमंत्री किंवा तुमचे पंतप्रधान स्वतःच्या खिशातून देत नाही. ही मदत सरकारच्या तिजोरीतून दिली जाते आणि सरकारी तिजोरी जनतेच्याच पैशांनी भरत असते. तेच पैसे तुमचे सरकार देत आहे. त्याच्या गमजा कसल्या मारता? सरकारी कृपेने तुम्हालाही ज्या सोयी-सवलती मिळत आहेत, त्यादेखील या जनतेचीच देण आहे. त्या जनतेशी बोलताना किमान तुमच्या आडनावातील ‘लोणी’ या शब्दाचे तरी भान ठेवा. मुळात तुम्ही कोण आहात हो जनतेला देणारे? लोकशाहीत जनताच देणारी असते आणि तिने तुम्हाला मते दिली म्हणूनच तुम्ही आज सत्तेत आहात. भाजपसारखे पक्ष हे सावकार आणि शेठजींचेच आहेत. आजही ते जनतेला गुलाम किंवा वेठबिगार मानतात. प्रे. ट्रम्प यांच्यापुढे शेपूट घालणारे हे लोक गोरगरीब जनतेच्या अंगावर गाढवासारखे ओरडतात व पुन्हा 50 वर्षांपूर्वीच्या आणीबाणीवर प्रवचने झोडतात. पंतप्रधान मोदी हे देशातील 80 कोटी जनतेला पाच-दहा किलो फुकट रेशन देतात ही गरिबीची आणि ‘विकास’ या शब्दाची थट्टाच आहे, पण मोदी हे स्वतःला अवतारी पुरुष मानतात. अशा अवतारी पुरुषाचे भक्त हे लोणीकरांसारखे सावकारच असणार. अवतारी पुरुष 20 हजार कोटींच्या विमानातून मजा मारत जगभर फिरतो. हे विमान ज्या जनतेच्या पैशांतून आले, त्या जनतेला सावकार लोणीकर गुलाम समजत आहेत. असे सामनातून म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com