जयकुमार गोरे कडाडले, आरोपांना प्रत्युत्तर देत म्हणाले, "माझ्या पाठीमागे देवाभाऊ..."
भाजपाचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे एका महिलेला नग्न फोटो पाठवल्याप्रकरणी अडचणीमध्ये आले होते. अशातच आता जयकुमार गोरे यांनी त्यांच्यावरील आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे आता त्यांच्याबद्दल राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरु आहे. माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे भाजपच्या शाखा उद्घाटन समारंभात शनिवारी रात्री जयकुमार गोरे बोलत होते.
यावेळी जयकुमार गोरे म्हणाले की, "अख्खा जिल्हा, अख्खं राज्य जयकुमार गोरेला अडवायला रोज नदीकिनारी जाऊन पूजा घालत आहे, काळ्या बाहुल्या रोवतंय. साध्या घरातलं पोरगं, आमदार तीनवेळा झालं. एक निवडणूक अशी झाली नाही, माझ्यावर केस झाली नाही. पण कधीही मी थांबलो नाही. कितीही आडवं या, कितीही दाबायचा प्रयत्न करा, कितीही बाहुल्या बांधा. पण जोपर्यंत जयकुमार गोरेच्या मागे जनता आहे, तोपर्यंत तुम्ही जयकुमार गोरेचं कधी वाकडं करु शकत नाही. कोणाचं वाईट केलं नाही, तर कधीच वाईट होत नाही. जो वाईट करतो, त्याचं चांगलं होत नाही. मी कोणाच्या नादाला लागत नाही. माझ्या नादाला कोणी लागायचं नाही".
पुढे ते म्हणाले, "सावज टप्प्यात आल्याशिवाय मी कधी हात लावत नाही. आता सावज टप्प्यात आलंय, थोडी वाट बघा. आज जास्त बोलणार नाही. माझ्या पाठीमागे देवाभाऊ उभा आहे". दरम्यान जयकुमार गोरे यांच्या भाषणाची सर्वत्र चर्चा सुरु आहे.