उद्धव ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्यावर बावनकुळेंच्या एका शब्दात टीका; म्हणाले...
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरू आहे. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीत देखील बंडखोरी झाली आहे. त्यातच दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. उद्धव ठाकरे सध्या दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरेंच्या याच दौऱ्यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सडकून टीका केली आहे.
नेमकं काय म्हणाले बावनकुळे?
शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर बोलताना बावनकुळे उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याला ‘नौटंकी’ म्हणत टीका केली. त्यानंतर आता या टीकेवर ठाकरे गटाकडून काय उत्तर येते हे बघण्यासारखं असेल.
या सोबतच बावनकुळे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून टीका केली आहे. त्यामध्ये ते म्हणाले की, उद्धव ठाकरे जी तीन वर्षांपूर्वी तुम्ही महाविकास आघाडी घरात घुसवून घेतली होती. याचा तुम्हाला विसर पडला काय? ज्यांना आज तुम्ही बाजारबुणगे म्हणत आहात कधीकाळी त्यांच्याच जीवावर तुम्ही मुख्यमंत्री झाला होतात.
तुमच्या नाकर्तेपणामुळे लोक शिवसेना सोडून बाहेर पडले हे विसरू नका. तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून राज्य चालवता आलं नाही आणि पक्षप्रमुख म्हणून पक्षही सांभाळता आला नाही. तुम्हाला मिळत असलेला "प्रचंड प्रतिसाद" पाहून तुमचे उरलेले साथीदारही तुमची साथ सोडत आहेत आणि येत्या काळातही लोक तुम्हाला सोडून जाणार आहेत. त्यामुळे भाजपवर टीका करण्याआधी बुडाखाली असलेला अंधार बघा. अशी टीका त्यांनी ठाकरेंवर केली होती.