दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांच्या घरावर सीबीआयचे छापे; राज्यपालांनीच केली होती शिफारस

दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांच्या घरावर सीबीआयचे छापे; राज्यपालांनीच केली होती शिफारस

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी सीबीआयने छापा टाकला आहे. यासंदर्भातील माहिती त्यांनी स्वतः ट्विट करुन दिली.
Published on

नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी सीबीआयने छापा टाकला आहे. यासंदर्भातील माहिती त्यांनी स्वतः ट्विट करुन दिली. सीबीआयचे स्वागत आहे. पण, आम्ही कट्टर प्रामाणिक आहोत, असे ट्विट करत सिसोदिया यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. दरम्यान, उत्पादन शुल्क धोरणावरून झालेल्या वादाच्या संदर्भात हे छापे टाकण्यात अल्याचे सांगण्यात येत आहे.

दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी केजरीवाल सरकारच्या अबकारी धोरणाची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस सीबीआयला केली होती. यावर केजरीवाल यांनी मनीष सिसोदिया यांना अटक केली जाऊ शकते असे भाकीतही वर्तविले होते. यानंतर आज मनीष सिसोदिया यांच्या घरी सीबीआयने छापा टाकला आहे. यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

मनीष सिसोदिया म्हणाले, आम्ही सीबीआयचे स्वागत करतो. पण, आम्ही कट्टर प्रामाणिक आहोत. तपासात संपूर्ण सहकार्य केले जाईल. जेणेकरून सत्य लवकर बाहेर येईल. आत्तापर्यंत माझ्यावर अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र, काहीही निष्पन्न झाले नाही. यातूनही काहीही निष्पन्न होणार नाही. देशात चांगल्या शिक्षणासाठी माझे काम थांबणार नाही.

दिल्लीच्या शिक्षण आणि आरोग्याच्या उत्कृष्ट कामामुळे हे लोक नाराज आहेत. त्यामुळेच शिक्षण आणि आरोग्याची चांगली कामे थांबवता यावीत यासाठी दिल्लीचे आरोग्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांना अटक करण्यात आली आहे. आमच्या दोघांवरही खोटे आरोप आहेत. न्यायालयात सत्य बाहेर येईल, असे आरोप त्यांना अप्रत्यक्षपणे मोदी सरकारवर केले आहेत. लाखो मुलांचे भविष्य घडवत आहे. आपल्या देशात चांगले काम करणाऱ्यांना अशा प्रकारे त्रास दिला जातो, हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळेच आपला देश अजून नंबर-१ बनलेला नाही, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे,

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com