Anjali Damania
Anjali Damania

Anjali Damania : 'एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री येणार? जनता अशीच भरडली जाणार?'

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

(Chhagan Bhujbal) राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून मंत्रिपद न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज पाहायला मिळालं होतं. यावेळी भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही भेट घेतली होती.

मुंबईत राजभवन येथे हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार असून राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी याबाबत परिपत्रक देखील जारी केलं असून यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाच्या सदस्यांचा शपथविधी समारंभ आयोजित केल्याची माहिती देण्यात आली आहे.

याच पार्श्वभूमीवर आता अंजली दमानिया (Anjali Damania ) यांनी ट्विट करत टीका केली आहे. अंजली दमानिया म्हणाल्या की, 'छगन भुजबळ मंगळवारी सकाळी 10 वाजता राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेणार? म्हणजे एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री येणार? जनता अशीच भरडली जाणार? की हा माझ्यासारख्या भ्रष्टाचार विरोधी लढणाऱ्यांना संदेश आहे, की तुम्ही आमचं काहीच वाकडं करू शकत नाही ?'

'असा काय नाईलाज आहे ? की सभ्य माणसं मिळत नाहीत राजकारणात? आणि हो, हेच भुजबळ जेव्हा जेल मध्ये होते, तेव्हा एक अगदी बिचाऱ्या सारखा फोटो माध्यमांमध्ये दाखवला जायचा. तेव्हा छातीत कळ यायची. मग आता ठणठणीत ?'

यासोबतच त्या पुढे म्हणाल्या की, 'किळस वाटतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची खालच्या घोषणा आठवतात? “भ्रष्टाचारीयो पर कारवाई के लिए, अब की बार ४०० पार”, “भ्रष्टाचार के खिलाफ मोदी सरकार के बडे कदम”, हा आहे का तो बडा कदम ? ही ती कारवाई ?' असे अंजली दमानिया म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com