'त्या' धाडसाच्या पाठीशी खांद्याला खांदा लावून देवेंद्र फडणवीस; वर्षपूर्तीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे विधान
राज्यात एक वर्षापूर्वी अभूतपूर्व राजकीय गदारोळ घडला. शिवसेनेत सर्वात मोठी बंडखोरी झाली. त्यामुळे मविआचे सरकार धोक्यात आले. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर राज्यात शिंदे गट- भाजपचे सरकार आले. आज या शिंदे- फडणवीस सरकारला स्थापन होऊन एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त आज ठाण्यातील टेंभीनाका येथील धर्मवार आनंद दिघे आश्रमात युती सरकारच्या वर्षपूर्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार भाषण केले.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
वर्षपूर्तीच्या कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, मागील वर्षभरात आम्ही सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम केले, हे मी छातीठोकपणे सांगू शकतो. वैयक्तीक लाभाचा एकही निर्णय आम्ही घेतला नाही. आपण सर्वांनी साथ दिली, प्रसंग बाका होता. काही लोक ठामपणे पाठीशी होते, काहीजण संभ्रमित होते. आतापर्यंत मी असे अनेक धाडसी निर्णय घेतले. त्यापाठीमागे बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे आशीर्वाद होते. असे ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल असे वाटले नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी माझ्यावर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली. या एकनाथ शिंदेंने जे धाडस केलं, त्या धाडसाच्या पाठीशी खांद्याला खांदा लावून देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टीम उभी राहिली आणि हा कार्यक्रम यशस्वी झाला, असे एकनाथ शिंदेंनी ठामपणे सांगितले.

