Chitra Wagh : आता तो परत आलाय, त्याचा पिक्चर संपलेला नाही, उलट त्याचा पिक्चर आता ॲक्शननं भरपूर असणार
महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आज 5 डिसेंबर 2024ला मुंबईच्या आझाद मैदानावर पार पडणार आहे. आज शपथविधी सोहळा होणार असून देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर चित्रा वाघ यांनी ट्विट केलं आहे. चित्रा वाघ म्हणाल्या की, मी ‘काडतूस’ आहे…झुकेगा नही ! ‘मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे घर मत बसा लेना, मै समंदर हूं, वापस आऊंगा’, असं तो म्हणाला, तेव्हा त्याची खिल्ली उडवली गेली... पण आज हा समुद्रासारख्या विशाल अंतःकरणाचा, समुद्राएवढ्या कर्तृत्वाचा, समुद्राइतकी वैचारिक खोली असणारा देवाभाऊ परत आलाय.
‘आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत, आम्ही चक्रव्यूह भेदणं जाणतो’, असं हा आधुनिक अभिमन्यू म्हणाला, तेव्हा त्याची चेष्टा झाली, पण त्यानं कावेबाजांचा, कुटिल कारस्थानांचा चक्रव्यूह भेदला. असा काही भेदला, की त्यातून उडालेल्या तेजाच्या किरणांनी भल्याभल्यांचे डोळे दीपून गेले. कुरुक्षेत्रावरचं युद्ध खूप जटिल, अवघड असणार आहे, हे या अभिमन्यूला माहीत आहे.... पण त्याला कर्तृत्वाची कवचकुंडलं मिळाली आहेत. ती घेऊन सर्वशक्तिनिशी तो परत आलाय.
‘मी पुन्हा येईन’ असं देवाभाऊ म्हणाला, तेव्हा त्याच्याविरुद्ध पाच वर्षं सातत्यानं कटकारस्थानांचे डोंगर रचले गेले; पण तो परत आलाय!!! परत आलाय गावांना जलयुक्त करण्यासाठी, शहरांचा चेहरा बदलण्यासाठी, महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी, नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी. ‘देवाभाऊ जो बोलता है, वो करता है, और जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता है’ असं म्हणणारा देवाभाऊ पाच वर्षांआधी जे बोलला, ते त्यानं करून दाखवलंय दोस्तों... आणि जे नाही बोलला, ते ‘डेफिनेटली’ करण्यासाठी आता परत आलाय.
‘फडतूस नाही, काडतूस आहे. झुकेगा नही घुसेगा साला’ असं तो म्हणाला होता. येस्स. या देवाभाऊनं ‘फडतूस’ लोकांना ‘काडतूस’ बनून पाताळात गाडलं. .. आता ‘झुकण्या’साठी नाही, तर ‘घुसण्या’साठी तो परत आलाय. देवाभाऊचा पाच वर्षांचा मुख्यमंत्रिपदाचा काळ हा महाराष्ट्राच्या विकासाच्या इतिहासातला सगळ्यात सोनेरी कालखंड होता. त्यानंतर अडीच वर्षं तो विरोधी पक्षनेता बनून कुटिल लोकांवर तुटून पडला.
यासोबतच त्या पुढे म्हणाल्या की, पुढची अडीच वर्षं धोरणीपणानं डावपेच आखत राहिला. आता तो परत आलाय. त्याचा पिक्चर संपलेला नाही. उलट त्याचा पिक्चर आता ॲक्शननं भरपूर असणार आहे. त्याच्या पिक्चरचं नाव कुणी तरी ‘अकेला फडणवीस’ असं ठेवलं होतं... पण त्याला चौदा कोटी जनतेनं पुन्हा एकदा ‘हिरो’ बनवलं. येस्स. तमाम महाराष्ट्राचा लाडका, जिगरबाज, चाणक्यनीतीत तरबेज, बहिणांचा पाठिराखा, शेतकऱ्यांचा सच्चा साथी, वंचितांचा खंदा आधार असलेला देवाभाऊ पाच वर्षांसाठी अवतरला आहे. आता तो काय करतो ते बघाच.... देवाभाऊका असली पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त... असे चित्रा वाघ यांनी ट्विट करत म्हटले आहे.