केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य चर्चेत, म्हणाले, "विशिष्ट पक्षाचे..."
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यान मुलीची छेड काढल्याप्रकरणी राजकीय वर्तुळातून अनेक संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. केंद्रीय मंत्र्यांचीच लेक सुरक्षित नसेल तर सामान्यांच्या मुलींच्या सुरक्षेचं काय असा प्रश्न जनसामान्यांमधून उपस्थित होत आहेत. खडसे यांच्या मुलीबरोबर तिच्या सुरक्षेसाठी गणवेशातील पोलीस कर्मचारी देखील होता. मात्र टवाळखोरांनी त्या पोलीस कर्मचाऱ्यासही दमदाटी केल्याचं खडसे यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटलं आहे.
रक्षा खडसे यांची मुलगी व स्वतः रक्षा खडसे यांनी याप्रकरणी स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला ताब्यात घेतले आणि इतर आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणातील काही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "दुर्दैवाने एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी या प्रकरणामध्ये आहेत. त्या लोकांनी अतिशय वाईट अशा प्रकारचे काम केलं आहे. त्यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी काही जणांना अटक देखील करण्यात आली आहे. इतर आरोपींना लवकरच अटक केली जाईल. परंतु, अशा प्रकारे छेडछाड करणं, सार्वजनिक ठिकाणी मुलींना त्रास देणं अतिशय चुकीचं आहे. कुठल्याही परिस्थितीत अशा लोकांना माफी देता कामा नये. त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई होईल".