मुंडे भाऊ-बहिण एकाच व्यासपीठावर; फडणवीसांची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
बीड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही शासन आपल्या दारी कार्यक्रमात उपस्थित होते. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेही व्यासपीठावर होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सूचक वक्तव्य केले. तुम्ही असेच एकत्र राहा, आम्ही तुमच्या पाठीशी राहू आणि बीडचा विकास करू, असे फडणवीस म्हणाले आहेत.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही तिघे एकत्र आलोय, आमचा ध्यास महाराष्ट्राचा विकास आहे, मात्र काही लोकांना हे नको आहे, हे बेताल बोलतात पण आम्ही लक्ष देत नाही. आम्ही प्रचाराला गेलो तर टीका केली, अरे तुम्हाला बाजूच्या घरचेही बोलवत नाहीत, मग तुमच्या पोटात का दुखतं? आता अजितदादांनाही घेऊन जाणार, अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली.
मराठवाडा आणि बीड जिल्हा दुष्काळाच्या छायेत आहे. शेतकरी अडचणीत आहेत. आपल्या जिल्ह्यात शेतकऱ्यांना पीकविमा अग्रीम मिळाला. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना आम्ही मदत करणार आहोत. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शेतीपिकाचा भाव वाढवण्यासाठी बैठक घेणार आहोत. आमच्या शेतकऱ्यांची मागणी असते दिवस बारा तास वीज मिळावी म्हणून निर्णय केला आहे. मुख्यमंत्री सोलार कृषी वीजपुरवठा होणार आहे. दोन वर्षात बीड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना अखंड वीज पुरवठा होईल. मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळणारच, असेही फडणवीसांनी म्हंटले आहे.