Eknath Khadse : एकनाथ खडसेंचा आरोप: रेव्ह पार्टीच्या नावाखाली कुटुंबाची बदनामी, पोलिस कारवाईवर प्रश्नचिन्ह
पुण्यातील खराडी येथील रेव्ह पार्टी प्रकरणानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी या प्रकरणावरून पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. “ही केवळ राजकीय सूडबुद्धीने प्रेरित कारवाई आहे,” असा दावा करत खडसे यांनी पत्रकार परिषद घेतली. विशेष म्हणजे यामध्ये खडसे यांच्या जावयासह सहा जणांना अटक झाली असून, या कारवाईबाबत त्यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले.
एकनाथ खडसे म्हणाले की, “ज्या ठिकाणी ही कारवाई झाली, तिथे फक्त पाच ते सात जण एका घरात होते. संगीत नव्हते, नृत्य नव्हते, कोणताही गोंधळ नव्हता. अशा ठिकाणी रेव्ह पार्टी होती, असे म्हणणे हास्यास्पद आहे. रेव्ह पार्टीची नेमकी व्याख्या काय, हे पोलिसांनी स्पष्ट करावे."
तसेच खडसे यांनी पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत अनेक शंका उपस्थित केल्या. “या पार्टीच्या ठिकाणचा व्हिडीओ फूटेज थेट प्रसारमाध्यमांमध्ये कसा पोहोचतो? पोलिसांना ही माहिती सार्वजनिक करण्याचा अधिकार कोणी दिला?” असा सवाल त्यांनी केला. खडसे यांनी म्हटले की, “कारवाईच्या दरम्यान महिला आणि पुरुष आरोपींचे चेहरे प्रसारित करण्यात आले, जे नियमबाह्य आहे. पोलिसांचा हेतू फक्त बदनामी करणे हा होता का, असा प्रश्न निर्माण होतो.”
खडसे यांनी यावेळी पुणे पोलिसांची पत्रकार परिषदेत उपस्थिती देखील उघड केली. “मी पत्रकार परिषद घेत असताना सिव्हिल ड्रेसमधील आठ ते दहा पोलिस घराबाहेर होते आणि थेट आत येऊन बसले. पोलिसांना खाजगी जागेत येण्याचा अधिकार कोणी दिला? माझ्यावर आणि कुटुंबावर पाळत ठेवली जात आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
“माझं तोंड बंद करण्याचा प्रयत्न का केला जातोय? सरकार कोणत्या भीतीने इतके पोलिस पाठवतं? हे राज्यात नेमकं काय सुरू आहे?” असा सवाल त्यांनी केला. प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून डॉ. प्रांजल खेवलकर यांचे नाव समोर येत असल्यावर खडसेंनी आक्षेप घेतला. “खेवलकर यांच्याकडे कोणताही अंमली पदार्थ सापडलेला नाही. मग त्यांना पहिल्या क्रमांकाचा आरोपी का केलं? एका मुलीच्या पर्समध्ये अंमली पदार्थ सापडले, मग ती पहिली आरोपी का नाही?”
यासोबतच त्यांनी वैद्यकीय चाचणीविषयीही प्रश्न उपस्थित केले. “मद्य सेवनाचा अहवाल काही तासांत येतो, पण अंमली पदार्थ चाचणीचा अहवाल येण्यास एवढा वेळ का लागतो? ससून रुग्णालयाचा नमुने बदलण्याचा इतिहास लक्षात घेता, या अहवालात फेरफार होणार नाही ना, अशी शंका वाटते,” असे खडसे म्हणाले. या संपूर्ण प्रकरणाने केवळ पोलीस कारवाईच नव्हे, तर प्रशासन आणि सरकारच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उभे केले असून, पुढील तपासात काय निष्कर्ष निघतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.