माजी मंत्री तानाजी सावंतांच्या मुलाचे अपहरण? नक्की काय आहे सत्य? जाणून घ्या
राज्याचे माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झाल्याची बातमी समोर आली आहे. पुणे विमानतळावरुन बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली. तानजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत हे बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच पुणे पोलिस विमानतळावर दाखल झाले. याप्रकरणी आता पोलिस तपास सुरु करण्यात आला. मात्र या तपासादरम्यान एक नवीन माहिती समोर आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, तानाजी सावंत यांचा मुलगा नाराजीमधून मित्रांसोबत परदेशात गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऋषीराज सावंत हे परदेशात सुखरुप असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तानाजी सावंत यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषद घेत सगळी माहिती सांगितली आहे.
तानाजी सावंत काय म्हणाले ?
माझ्या मुलाचे अपहरण झाले नाही. त्याच्यासोबत त्याचे दोन मित्र आहेत. त्याचा फोन न आल्याने मला खुप काळजी वाटू लागली. आम्ही एकमेकांना दिवसांतून वीस फोन तरी करतो. मात्र तो अचानक विमानतळावर का गेला? या काळजीपोटी मी पोलिस आयुक्त व अधिकाऱ्यांना फोन केला. ते तिघंही खासगी विमानाने गेले आहेत. त्याच्या मित्रांची नावंदेखील माहीत नाहीत. आमच्यामध्ये नेहमीच संवाद होतो. मात्र आज त्याच्याबरोबर काहीही बोलणं झालं नाही त्यामुळे मी घाबरलो आणि अस्वस्थ झालो". ?
पोलिस काय म्हणाले?
तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण झाले नाही. तो नाराज होऊन मित्रांबरोबर बाहेर गेला असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र तो कुठे गेला आहे? याबद्दलची अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. या प्रकरणासंदर्भात आता क्राइम ब्रांच अधिक तपास करत आहे.