'गुजरातने तोंडचा घास हिरावला, मुख्यमंत्री महाराष्ट्रातील तरुणांची माफी मागतील का?'

'गुजरातने तोंडचा घास हिरावला, मुख्यमंत्री महाराष्ट्रातील तरुणांची माफी मागतील का?'

जयंत पाटील यांचा शिंदे सरकारला सवाल
Published on

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना राजकीय सभा घेण्यातून वेळ मिळत नसल्याने पुन्हा एकदा गुजरातने महाराष्ट्राच्या तोंडचा घास हिरावून घेतला असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. वेदांता महाराष्ट्रातील प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला जाणार असल्याच्या बातमीवर विरोधकांनी आता शिंदे सरकारवर टीकास्त्र डागण्यास सुरुवात केली आहे.

गुजरातची निवडणूक तोंडावर आल्याने महाराष्ट्रातील भाजप गुजरातचे हित जपण्यात व्यस्त असल्याचे दिसत असून महाराष्ट्रातील तरुणांचा हक्काचा रोजगार गमावल्याबद्दल राज्यातील सुशिक्षित, बेरोजगार तरुणांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री माफी मागतील का? असा संतप्त सवालही जयंत पाटील यांनी केला आहे.

वेदांत ग्रुप व फोक्सकॉन कंपनीच्या संयुक्त भागीदारीत सुमारे २० बिलियन डॉलर्स म्हणजेच एक लाख 58 हजार कोटी इतकी भांडवली गुंतवणूक असलेला प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून निसटून गुजरातला गेलेला आहे. सुमारे एक लाख इतकी रोजगारक्षमता असलेला प्रकल्प महाराष्ट्राने गमावला आहे, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

महाविकास आघाडीने या गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा केला होता. या कंपनीच्या शिष्टमंडळाने नुकतीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली होती याची आठवणही जयंत पाटील यांनी ट्विटवरुन करुन दिली आहे.

दरम्यान, वेदांत ग्रुप व फोक्सकॉन कंपनी गुजरातला गेल्याने शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनीही शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे. नवीन गुंतवणूकदारांना या खोके सरकारवर विश्वास नाही. म्हणूनच प्रकल्प गुजरातला गेला, असे टीकास्त्र शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर सोडले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com