'निर्भया निधीतील वाहने शिंदे गटाच्या आमदारांच्या संरक्षणासाठी; नक्की कशाची भीती वाटते?'

'निर्भया निधीतील वाहने शिंदे गटाच्या आमदारांच्या संरक्षणासाठी; नक्की कशाची भीती वाटते?'

जयंत पाटील शिंदे गटावर कडाडले
Published on

मुंबई : निर्भया निधी महिलांची सुरक्षितता आणि महिलांवरील गुन्हे रोखण्यासाठी केंद्रातील तत्कालीन युपीए सरकारने तयार केलेला निधी होता. मात्र या निधीतून घेतल्या गेलेल्या वाहनांचा उपयोग फुटीर आमदारांच्या संरक्षणासाठी केला जात आहे त्यामुळे ही वाहने तात्काळ पोलीस स्टेशनला जमा करावीत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे.

एकीकडे मुख्यमंत्री जनता त्यांच्या सोबत असल्याचा दावा करतात, दुसरीकडे ते त्यांच्या प्रत्येक समर्थक आमदार व खासदाराला पाच पोलिसांची वाय प्लस दर्जाची सुरक्षा देतात. जनता त्यांच्यासोबत असेल तर मग त्यांना नक्की भीती कशाची वाटते आहे? असा सवालही जयंत पाटील यांनी केला आहे.

दरम्यान, निर्भया निधीतून घेतलेली वाहने ही पोलीस स्टेशन्सला त्वरित पाठविण्यात यावीत. आमदारांच्या सुरक्षिततेपेक्षा राज्यातील जनता व महिला भगिनींची सुरक्षा आम्हाला जास्त महत्वाची वाटते असेही जयंत पाटील यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com