"दोन जातींमध्ये भांडणं...", कैलास बोरडे मारहाण प्रकरणामध्ये लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगेंवर आरोप
जालना जिल्हयामधील भोकरदन गावातील कैलास बोराडे यांना मंदिरात प्रवेश केल्याप्रकरणी मारहाण झाली. या घटनेला मात्र आता एक वेगळे वळण लागलेले दिसून आले आहे. विधीमंडळातही या विषयावरुन वातावरण तापलेले बघायला मिळाले. धनगर तरुण मंदिरात गेल्याने त्याला लोखंडी सळीने चटके देत मारहाण केली. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. यावर मनोज जरांगे यांनीही पत्रकार परिषद घेत मोठा दावा केला आहे. यावेळी त्यांनी एक व्हिडिओ दाखवत त्याच मंदिरात एका व्यक्तीने नंदी बैलाच्या मूर्तीची विटंबना केली असे त्या व्हिडिओ मध्ये दिसते. ही व्यक्ती म्हणजे बोराडेच असल्याचा संशय असल्याचे जरांगे म्हणाले. जरांगे यांच्या या वक्तव्यावर लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
लक्ष्मण हाके प्रतिक्रिया देत म्हणाले की, "जरांगेंनी बोराडेचा दारु प्यायल्याचा व्हिडीओ दाखवला. बोरडे हा शिवभक्त आहे. तो महाशिवरात्रीला गेला होता. त्या माणसाने कोणतेही चुकीचे कृत्य केले नाही. एका धनगर तरुणाला मारण्याचा प्रयत्न केला जातो. पण जरांगे यांच्या कृतीमुळे राज्यामध्ये दोन जातींमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. बोराडेला न्याय मिळावा अशी मागणीदेखील मी करत आहे".
यादरम्यान हाके म्हणाले की, " बोराडे अर्धवट कपड्यात गेला असल्याचा आरोप जरांगे करत आहेत. पण अश्लील हावभाव केला म्हणून मारहाण करणार का? त्यासाठी पोलिस यंत्रणा आहे ना? असे असेल तर मग मंदिरातील पुजारी आणि कुंभमेळामधील साधू काय पूर्ण कपड्यात असतात का?' असा सवाल देखील हाकेंनी जरांगेंना केला आहे.
नंतर ते म्हणाले की, "मुखमंत्र्यापासून सगळे नेते राजकारण करत आहेत. का न्याय देत नाही आम्हाला? एकाला एक न्याय आणि एकाला एक न्याय देणार असतील मुख्यमंत्री तर आम्ही त्याच्या विरोधात ही रस्त्यावर उतरु" असेही हाके म्हणाले.