CM Devendra Fadanvis On Ladki Bahin Yojana : "ज्यांना अर्थसंकल्प कळत नाही, त्यांनी...", 'लाडकी बहिण'साठी आदिवासी विभागाचा पैसा वळवल्यावरून मुख्यमंत्र्यांचे भाष्य
राज्य सरकारची लोकप्रिय योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. निवडणुकांपूर्वीपासूनच चर्चेत असलेली ही योजना आता निधीवरुन सातत्याने चर्चेत असते. या योजनेसाठी शासनाच्या विविध विभागांचा निधी वळवल्याची तक्रार सातत्याने होत आहे. आता पुन्हा एकदा या योजनेसाठी आदिवासी विभागाचा 335 कोटी 70 लाखांचा निधी वर्ग करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याआधीदेखील दोन वेळा हा निधी वळवल्याचे समोर आले होते. या सगळ्याला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "निधी वळल्याचा आरोप अतिशय चुकीचा आणि खोटा आहे. अर्थसंकल्पाची पद्धती ज्यांना कळत नाही तेच अशाप्रकारे आरोप करतात. अर्थसंकल्पाच्या नियमानुसार वैयक्तिक लाभासाठी जो निधी दिला जातो, तो आदिवासी विभागातच दाखवावा लागेल. तसेच अनुसूचित जाती व सामाजिक न्याय विभागातच तो दाखवावा लागेल. यासंदर्भात अर्थमंत्री अजित पवार यांनीही सभागृहात खुलासा केला आहे. त्याचप्रमाणे या विभागांचं बजेट पावणे दोन पटींनी वाढलं आहे, त्यामुळे ही अकाऊंटिंगची पद्धत आहे. कुठलाही पैसा पळवलेला नाही आणि कुठलाही पैसा वळवलेला नाही".
पुढे ते म्हणाले की, "अर्थसंकल्प ज्यांना कळत नाही त्यांनी माझ्याकडे यावे. अर्थसंकल्प कसा वाचावा? यावर मी पुस्तक लिहिले आहे. मी ते पुस्तक त्यांना देईन", असेही फडणवीस म्हणाले.