Manisha KayandeTeam Lokshahi
राजकारण
Manisha Kayande : मनिषा कायंदेंची ठाकरे गटातून हकालपट्टी, उद्धव ठाकरेंच्या आदेशाने कारवाई
मनिषा कायंदेंच्या हकालपट्टीबाबत प्रसिध्दीपत्रकातून दिली ठाकरे गटाने माहिती.
काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत बंडखोरी झाली. त्यानंतर बंडखोरीनंतर आमदारांसह अनेक पदाधिकारी ठाकरे गट सोडून शिंदे गटात सामील झाले. मात्र, अद्यापही ठाकरे गटाची गळती थांबण्याचे नाव घेत नाहीये. ठाकरे गटाच्या प्रवक्त्या मनिषा कायंदेही शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या बातम्या येत असताना आता ठाकरे गटाने कायंदे यांच्यावर मोठी कारवाई केली आहे.
आज सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर मनिषा कायंदे शिंदे गटात पक्षप्रवेश करणार आहेत. या दरम्यान आता मनिषा कायंदे यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई केली. असे ठाकरे गटाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे.