Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात इनकमिंग सुरू
विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी आज (दि.23) राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा विधीमंडळ गटनेते डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. दरम्यान, या प्रसंगी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना, राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेल्या लोकांमुळे शिवसेनेतील जुन्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून नाराज शिवसैनिक आपल्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या पक्ष कार्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला. या वेळेस शहराध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिलाध्यक्ष सुजाताताई घाग, कळवा - मुंब्रा विधानसभाध्यक्ष शमीम खान, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष मुफ्ती अशरफ आदी पदाधिकारी उपस्थित होते.
एमआयएम, काँग्रेस या पक्षांसह इतर राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांनी शरद पवार आणि डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या धर्मनिरपेक्ष विचारधारेवर विश्वास ठेवून हा पक्ष प्रवेश केल्याचे प्रवेशकर्त्या कार्यकर्त्यांनी सांगितले. तर डाॅ.जितेंद्र आव्हाड म्हणाले की, सध्या पक्षाच्या संघर्षाचा काळ आहे. या काळातही शमीम खान आणि मुफ्ती अशरफ यांच्या पुढाकारातून शेकडो कार्यकर्ते पक्षात आले आहेत. पक्षात आलेले हे कार्यकर्ते धर्मनिरपेक्ष विचारधारेवर चालणारे आहेत. सध्याच्या अस्थिर वातावरणातही राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षच न्याय करू शकतो, यावर लोकांचा विश्वास आहे, हे या पक्षप्रवेशाने सिद्ध झाले आहे, असे डाॅ.जितेंद्र आव्हाड म्हणाले.
कळव्यातील पक्षफुटीबाबत विचारले असता, लोकांच्या घरात काय चालले आहे, हे वाकून बघायची आपणाला सवय नाही. मात्र, शिवसेनेतील इच्छुकांची भरमार झाली आहे. ते सर्वांनाच उमेदवारीचे आश्वासन देत आहेत. जणू काही 130 चे 260 नगरसेवक ते सभागृहात नेणार आहेत. पण, इथून तिकडे गेलेल्यांना उमेदवारीचे आश्वासन दिल्याने जे जुणे जाणते शिवसैनिक नाराज झाले आहेत. हे नाराज आपल्या संपर्कात आहेत, असेही डाॅ.जितेंद्र आव्हाड म्हणाले.
हिंदीचा वाद लक्ष हटविण्यासाठीच
पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. हा अकारण निर्माण केलेला वाद आहे. मूळ प्रश्नावरून जनतेचे लक्ष हटविण्यासाठी हिंदीचा विषय ताणला जात आहे. मात्र, हिंदीचे कौतूक करताना इंग्रजीला शिव्या दिल्या जात आहेत. इंग्रजी ही वैश्विक भाषा आहे. त्यामुळे जगात इंग्रजी बोलली जात आहे. या भाषेला दुय्यम स्थान देण्याऐवजी प्रत्येक मातापित्याने आपल्या मुलांना इंग्रजीचे शिक्षण द्यावे, असे आवाहनही डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी केले.
जनतेच्या तक्रारींचा ऑन दि स्पाॅट निपटारा
"आमदार आपल्या भेटीला" हा अभिनव उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने राबविण्यास सुरूवात करण्यात येत आहे. आज पक्ष कार्यालयात हा उपक्रम राबविण्यात आला. डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्तिशः तक्रारदारांना भेटून सुमारे 50 पेक्षा अधिक तक्रारींचे निरसन केले.