"आयुष्याचा सट्टा खेळून आम्ही भाजपकडे आलो" गुलाबराव पाटलांचे मोठे विधान
राज्यात मागील तीन महिन्यांपूर्वी अभूतपूर्व राजकीय गोंधळ घडला. राज्यातील सर्वात मोठा पक्ष असणारा शिवसेना या पक्षात सर्वात मोठी बंडखोरी झाली. संपूर्ण जगाने या बंडखोरीची दखल घेतली. शिवसेना पक्षातील नंबर दोनचे नेते एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंडखोरी केली. त्यांना अपक्ष आणि इतर मित्र पक्षाच्या आणखी 10 आमदारांनी साथ दिली होती. त्यामुळे मविआचे सरकार पडले. बंडखोरीनंतर शिंदे गटाचे नेते आपण पक्ष नेतृत्वाविरोधात उठाव केल्याचे वारंवार सांगतात. विशेष म्हणजे शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी खळबळजनक विधान केले आहे.
काय म्हणाले गुलाबराव पाटील?
आयुष्याचा सट्टा खेळून आम्ही भाजपकडे आलो. साधं सरपंचपद कोणी सोडत नाही. आम्ही 8 जणांनी मंत्रीपद सोडून दिले होते. आमची संख्या पूर्ण झाली नसती तर आम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली राहिली असती, उठावासाठी 38 आमदार लागणार होते. मी 33 वा होतो, 5 आमदार आले नसते तर माझा कार्यक्रम आटोपला असता, असं गुलाबराव पाटील म्हणाले.
पुढे त्यांनी नाव न घेता संजय राऊत यांच्यावरही नाव न घेता निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूच्या लोकांनी आम्हाला ‘दिखते हो शेर जैसे लगते हो चुहे जैसे’ असं म्हणून आम्हाला डिवचलं, असं मरण्यापेक्षा शहीद झालो तरी चालेल अशी खून गाठ डोक्यात बांधत आम्ही बाहेर पडलो होतो, असे देखील विधान गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

