Mihir Kotecha : भाजपाच्या 'या' आमदाराला जीवे मारण्याची धमकी, नेमकं काय झालं ?
राज्यात गुन्हेगारीच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. अशातच आता मुंबईमधील मुलुंड येथील भाजपाचे आमदार मिहिर कोटेचा यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. दरम्यान धमकी देणाऱ्याला पोलिसांनी अटकदेखील केले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मुलुंड मतदार संघाचे आमदार मिहीर कोटेचा यांच्या ड्रायव्हरला धमकी दिली आहे.
ड्रायव्हरने सांगितल्याप्रमाणे धमकी देणारा आला आणि म्हणाला की, "तू आमदाराचा ड्रायव्हर आहेस ना? तुझ्या आमदाराला सांग, हिशोबामध्ये राहिला नाही तर सोडणार नाही. माझं नाव सत्यवान गरुड आहे, तुझ्या आमदाराला माहित आहे", असंही त्याने दमदाटी करून सांगितलं.
त्यानंतर लगेचच ड्रायव्हर मुत्तु तेवर यांनी मुलुंड पोलीस ठाण्यात धाव घेतली. धमकी देणाऱ्या इसमाविरोधात तक्रार दाखल केली. असून मुलुंड पोलिसांनी लगेच कारवाई करत सत्यवान गरुड नावाच्या या इसमाला ताब्यात घेतलं आहे.