Nawab Malik : नवाब मलिक यांच्यावर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मोठी जबाबदारी
( Nawab Malik) मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) हालचालींना वेग आला असून, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी देत मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे. ही नियुक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी जाहीर केली.आगामी मुंबई महापालिका निवडणूक ही नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखालील निवडणूक व्यवस्थापन समितीमार्फत लढवली जाणार आहे. पक्षाच्या धोरणात्मक तयारीसाठी आणि निवडणूक नियोजनासाठी ही समिती कार्यरत राहील.
समितीमध्ये अध्यक्ष नवाब मलिक यांच्यासह मुंबई कार्याध्यक्ष म्हणून शिवाजीराव नलावडे आणि सिध्दार्थ कांबळे, आमदार सना मलिक-शेख, माजी आमदार झिशान सिद्दीकी, प्रदेश सरचिटणीस संतोष धुवाळी, प्रदेश उपाध्यक्ष भास्कर विचारे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे आणि राजू घुगे यांचा समावेश आहे. तसेच निमंत्रित सदस्य म्हणून दक्षिण जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, उत्तर-पश्चिम जिल्हाध्यक्ष अजय विचारे, उत्तर-मध्य जिल्हाध्यक्ष अर्शद अमीर, उत्तर जिल्हाध्यक्ष इंद्रपाल सिंग आणि ईशान्य जिल्हाध्यक्ष सुरेश भालेराव यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्त्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील निवडणूक मोहिमेला नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाची संघटनशक्ती आणि प्रचारयंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी ही समिती महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.