Murlidhar Mohol : "रोज काहीतरी बोगस ट्विट..." रविंद्र धंगेकर यांच्या 'त्या' आरोपावर मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया, म्हणाले...
थोडक्यात
रविंद्र धंगेकर यांचे मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप
रविंद्र धंगेकरांच्या आरोपावर मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया
"रोज काहीतरी बोगस ते ट्विट करतात"
(Murlidhar Mohol) शिवसेनेचे रविंद्र धंगेकर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमिनीच्या व्यवहार प्रकरणात शिवसेनेचे रविंद्र धंगेकर यांनी भाजपाचे नेते आणि मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.त्यांच्या या भूमिकेमुळं भाजप नेत्यांकडून तक्रार करण्यात आल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर आता अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता रविंद्र धंगेकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यातच आता रविंद्र धंगेकरांनी मुरलीधर मोहोळांवर नवा आरोप केला आहे. महापौर असताना मोहोळ जैन बोर्ड जमिन व्यवहार प्रकरणाशी संबंधित असलेल्या बढेकर बिल्डरची गाडी वापरायचे असा आरोप धंगेकर यांनी केला असून गाडीचे फोटो ट्वीट करत त्यांनी हा आरोप केला आहे.
याच पार्श्वभूमीवर आता मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुरलीधर मोहोळ म्हणाले की, "रोज काहीतरी बोगस ते ट्विट करतात. मी दोन वेळा तुम्हाला स्पष्टीकरण दिलं. आज शेवटचं स्पष्टीकरण तुम्हाला देतो. प्रत्येक गोष्टी पुरावा मागा. पुण्यातला पहिला महापौर आहे ज्याने स्वत:च्या खर्चाची गाडी वापरली. महानगरपालिकेची गाडी वापरली नाही. माझ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रामध्ये मी स्पष्ट दिलं आहे की, मी या पार्टनरशिपमध्ये पार्टनर आहे. त्या पार्टनरशिपमधली माझी गाडी मी वापरली. स्वत:चं इंधन वापरलं."
" पुणेकरांना अभिमान वाटला पाहिजे आणि वाटतो की, एक महापौर असा मिळाला की, ज्याने स्वत:ची गाडी वापरली. विकृत मनोवृत्तीचा माणूस रोज काहीतरी बोलतो. मी त्या माणसासोबत निवडणुकीलाही नाही बोललो. व्यक्तिगत द्वेष, आकस. बोगस कार्यक्रम चालला आहे. मला काही उत्तरे द्यायची नाही. त्यांचे अनेक विषय बाहेर येत आहेत. त्यांच्यावर दहा गुन्हे आहेत माझ्यावर एक गुन्हा दाखवा. मला या माणसाबद्दल काही बोलायचं नाही". असे मुरलीधर मोहोळ म्हणाले.
