नवनीत राणांची आदित्य ठाकरेंच्या बिहार दौऱ्यावर टीका; म्हणाल्या, मोठे पप्पू...
नुकताच शिवसेना ठाकरे गट नेते आदित्य ठाकरे यांच्या बिहार दौरा पार पडला. त्या दौऱ्यात त्यांनी बिहारमधील अनेक नेत्यांची भेट घेतली. मात्र, या भेटीमुळे आणि दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली होती. या दौऱ्यावर अनेक विरोधकांनी प्रतिक्रिया देत टीका केली. त्यावरच आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी विखारी टीका केली आहे.
काय म्हणाल्या नवनीत राणा?
अमरावती माध्यमांशी बोलताना राणा म्हणाल्या की, “मोठे पप्पू आत्ताच महाराष्ट्रातून गेले. आता दुसरे पप्पूही निघालेत. शरद पवार असो की आमचे इतर मोठे नेते ज्यांना आम्ही फॉलो करतो त्यांना महाराष्ट्राच्या जनतेवर आणि निर्णयावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळेच ते महाराष्ट्र सोडून बाहेरची मदत घेण्याची गरज पडत नाही.” “महाराष्ट्रातील जनतेवर विश्वास नाही म्हणूनच दुसऱ्या राज्यात जाऊन इतरांसमोर हात पसरत आहेत. त्यांनी इथं महाराष्ट्रात काम केलं असतं आणि गरीब जनतेमध्ये राहिले असते, त्यांच्या प्रश्नांवर काम केलं असतं तर महाराष्ट्राचं खूप चांगलं झालं असतं,” असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.
राज्यपाल हे संवैधानिक पद आहे
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानांवर बोलताना राणा म्हणाल्या की, “भगतसिंह कोश्यारी तसं जाणीवपूर्वक बोलले की अचानक विचार न करता बोलले हे माहिती नाही. मात्र, आम्ही स्वतः त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. राज्यपाल हे संवैधानिक पद आहे. त्यांना हटवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्याकडे जावं लागेल.” असे त्या यावेळी म्हणाल्या.
पुढे ते म्हणाल्या की, “शिवाजी महाराजांवर असं कोणीही बोलू नये. एवढ्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीने तर अजिबात बोलू नये. मात्र, यांना पदावरून हटवा, नाही तर पूर्ण महाराष्ट्र बंद करू असं म्हणून उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत. महाराष्ट्र बंद करणं म्हणजे खूप लोकांना अडचणीत आणणं आहे. या पदावर राजकारण करू नये,” असंही मत राणांनी व्यक्त केलं.