गृहनिर्माण सोसायटीमध्ये दारूदुकानासाठी 'ना हरकत प्रमाणपत्र' बंधनकारक, उपमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
राज्यात गृहनिर्माण सोसायटीबद्दल अजित पवारांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. गृहनिर्माण सोसायटीच्या व्यावसायिक गाळ्यामध्ये बियर किंवा दारूचे दुकान सुरु करायचे असेल तर आता सोसयटीचे 'ना हरकत प्रमाणपत्र' बंधनकारक राहणार असल्याचे सांगितले गेले आहे. अजित पवार यांच्या या घोषणेमुळे गृहनिर्माण सोसायटीमधील वातावरण कलहमुक्त राहण्यास तसेच तरुण पिढी व्यसनाधिनतेकडे जाण्यास प्रतिबंध राहील.
अजित पवार यांच्या या घोषणेचे सर्वत्र स्वागत होत आहे. राज्यातील अनेक ठिकाणी गृहनिर्माण सोसायटीमध्ये बियर आणि दारू दुकानांना परवानगी दिल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे . हा मुद्दा भाजप आमदार महेश लांडगे आणि आमदार राहुल कुल यांनी उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना अजित पवार यांनी सांगितले की, राज्यामध्ये दारूबंदीच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी अशी राज्याची भूमिका आहे. शाळा, महाविद्यालय परिसरात दारूदुकानांना परवानगी नाही. तसेच स्थानिकांचा जर विरोध असेल तर मतदान करून दारूदुकाने बंद करण्याचाचा कायदा आहे.
राज्यात दारुविक्रीला प्रोत्साहन देण्याची शासनाची भूमिका नसून अवैध दारुविक्री रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. दारुमुळे राज्याची कायदा-सुव्यवस्था बिघडेल असा कोणताही प्रकार सहन केला जाणार नाही. यासंदर्भत लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून येणाऱ्या प्रत्येक सूचनेचा सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात दिले.