राठोडांच्या मंत्रीपदावर पूजा चव्हाणच्या आजीची संतप्त प्रतिक्रिया
Sanjay Rathod : काल शिंदे-फडणवीस सरकारचा ४१ दिवसांनंतर मंत्रीमंडळ विस्तार झाला. यामध्ये काल दोन्हीकडच्या १८ आमदारांनी शपथ घेतली. मात्र, या शपथविधीनंतर सर्वत्र टीकेची झोड सुरु झाली आहे. माजी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर पुजा चव्हाण प्रकरणावरून सर्वाधिक टीका होत आहे. दरम्यान, ज्या प्रकरणामुळे राठोडांवर टीका होत आहे, त्या पीडीतेच्या नातलगांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राठोड जनतेच्या नजरेत निर्दोष नाहीत. एका पक्षानं राठोड यांना वाचावलं, तर दुसरा पक्ष त्यांना मंत्रिमंडळात स्थान देतोय, हे बरोबर नाही. पूजा चव्हाणला न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असं वक्तव्य पूजा चव्हाणची आजी शांताबाई राठोड यांनी केलं आहे. (Pooja Chavan's grandmother's angry reaction to Rathod ministership)
दरम्यान, संजय राठोड यांनी शपथ घेतल्यानंतर अनेक राजकीय पुढाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. संजय राठोड यांच्यावर बोलताना भाजपच्या चित्रा वाघ यांनी शिंदे गटाला घरचा आहेर दिला आहे. राठोड हे मविआ सरकारमध्ये वनमंत्री असतानाच हे आरोप झाले होते. तत्कालीन विरोधी पक्ष भाजपने राठोडांविरोधात टीकेची झोड उठवली होती. मात्र आता शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर त्याच संजय राठोड यांना मंत्रिपदात स्थान देण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता पुजा चव्हाणच्या आजीने यावर संताप व्यक्त केला आहे.
काय आहे प्रकरण ?
संजय राठोड हे तत्कालिन महाविकास आघाडी सरकारमध्ये वनमंत्री होते. यादरम्यान बीडच्या पुजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी त्यांचे नाव समोर आले होते. यावेळी भाजपने त्यांच्याविरोधात रान पेटवले होते. यामुळे त्यांना आपला मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. दरम्यान, आता पुन्हा त्यांची मंत्रीपदी वर्णी लागल्यामुळे त्यांच्यावर विरोधक तोंड सुख घेताना दिसत आहेत.