राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड; आदित्य ठाकरे म्हणाले...
राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे. राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली असून राहुल नार्वेकर यांच्याविरोधात कोणत्याही पक्षाकडून दुसरा अर्ज दाखल न झाल्यानं त्यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सकाळी जी विधानसभा अध्यक्षांची निवड होती. त्याच्यावर बहिष्कार टाकलेला आहे. मंत्र्यांचा परिचय हा सगळ्यांना चांगलाच आहे. काल आम्ही ही निवडणूक बिनविरोध केली आणि त्यानंतर जे नाव पुढे आले. जे अध्यक्ष आज झालेले आहेत. ज्यांची निवड झालेली आहे. ते अध्यक्ष मागच्यावेळी देखील गेल्या अडीच वर्षामध्ये आपण पाहिलं असेल एक घटनाबाह्य सरकार चालवण्यासाठी मदत करत होते. आमची हीच माफक अपेक्षा आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये त्यांच्या अध्यक्षतेखालती असा पुन्हा अन्याय होणार नाही. ही आमची अपेक्षा आहे. त्यांच्याकडून गॅरंटीही मिळणे गरजेचे आहे की जो अन्याय, जो संविधानाचा अपमान गेल्या अडीच वर्षात त्यांनी केलेला आहे. तो पुन्हा होणार नाही. हे कुणीतरी आम्हाला आश्वासन देईल का?
यासोबतच ते पुढे म्हणाले की, जो आनंदसोहळा, कौतुक सोहळा आत चालला आहे. ठिक आहे स्वत: चे कौतुक करु शकतात, इतर नेते, गटनेते देखील अध्यक्षांचे कौतुक करतील. पण हे एका बाजूला करत असताना बेळगावमध्ये जो मराठी माणसांवर अन्याय होत आहे. कालपासून आपण पाहतोय वातावरण चिघळत गेले आहे. सरकार कोणाचही असले तरी आम्ही मराठी माणसासोबत राहू. अन्याय हा सहन करणार नाही. बेळगावला लगेच केंद्रशासित केलं पाहिजे. त्यानंतर पुढचा निकाल लागला पाहिजे. असे आदित्य ठाकरे म्हणाले.