Ramdas Kadam: 'लाज वाटली पाहिजे, उद्धव ठाकरे तुम्ही सगळं गमावलं', रामदास कदमांचा हल्लाबोल
आज रत्नागिरीमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची सभा झाली. या सभेत अनेक नेत्यांच्या पक्षप्रवेशावरून उद्धव ठाकरेंना शिंदे गटाच्या नेत्यांनी सुनावले आहे. राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशानंतर तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्लीत झालेल्या सत्कारावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह शरद पवार यांच्यावर देखील टीका केली होती. यावरून आता शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी संजय राऊत यांच्यासह उद्धव ठाकरेंवर देखील टीकांचा वर्षाव केला आहे. लाज वाटली पाहिजे, उद्धव ठाकरे तुम्ही सगळं गमावलं असं म्हणत उद्धव ठाकरेंवर बोलताना रामदास कदम यांनी हल्लाबोल केला आहे. त्याचसोबत राजन साळवींचा पक्ष प्रवेश ही उध्दव ठाकरे यांना राजकीय कानफट असल्याच देखील रामदास कदम म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद घेवून सर्व काही गमावले - रामदास कदम
रामदास कदम म्हणाले की, कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आज इथे हे भगवे वादळ पाहून खुप आनंद झाला ही भगवी लाट पाहून आज शिवसेना प्रमुखांची आठवण आली. बाळासाहेबांना आज सांगू इच्छितो कोकणात आजही शिवसेना आपल्या सोबत आहे. शिंदे साहेब बाळासाहेब तुम्हाला आशीर्वाद देतील एकनाथ मी तुझ्या सोबत आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना प्रमुखांचे विचार जिवंत ठेवलेत. उद्धव ठाकरेनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले, शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री होवू शकले नसते का? पण ते झाले नाही, उद्धव ठाकरे तुम्हाल लाज वाटली पाहिजे, तुम्ही मुख्यमंत्री पदी विराजमान झालात आणि शिवसेना फुटली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद घेवून सर्व काही गमावले. असा टोला रामदास कदम यांनी लगावला आहे.
आम्हाला तोंड उघडायला लावू नका रामदास कदम यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
रत्नागिरी जिल्हा परिषदेचं अध्यक्ष शिवसेनेचा असेल. एक दिवस असा येईल की रात्री दोन वाजता तुम्हाला हा देश सोडून लंडनला जावे लागेल. लंडनला तुमचे काय आहे, अमेरिकेत तुमचे काय आहे. श्रीलंकेत तुमचे काय आहे. इतर कुठे कुठे काय काय आहे? आम्हाला सर्व माहीत आहे. आम्ही सुद्धा 50 वर्षे ‘मातोश्री’सोबत काढली आहे. आम्हाला तोंड उघडायला लावू नका. आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत जे दहा-पंधरा लोक राहिले आहेत, त्यातील एकही दोन वर्षांत राहणार नाही. एकनाश शिंदे यांच्या विरोधात बोलला तर याद राखा, असं म्हणत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना खरीखोटी सुनावली आहे.