धक्कादायक! शिकवणीला जाणाऱ्या विद्यार्थिनीसोबत लुटमार

धक्कादायक! शिकवणीला जाणाऱ्या विद्यार्थिनीसोबत लुटमार

गोरेगाव पोलिसांनी २४ तासांत आरोपीला अटक केली. दरोडेखोराने मुलीच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढला.
Published by :
Sagar Pradhan
Published on

रिद्धेश हातिम|मुंबई: मुंबईतील गोरेगाव येथे मोतीलाल नगर परिसरात क्लासला जाणाऱ्या विद्यार्थिनीच्या गळ्यातील चेन हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. गोरेगाव पोलिसांनी तात्काळ सीसीटीव्हीच्या मदतीने 2 आरोपींना गोरेगाव परिसरातून अटक केली आहे. आरोपी गोरेगावातील रहिवासी असून मालाड, दहिसर, बांगूर नगरच्या अनेक पोलीस ठाण्यात घरफोडी, लुटमारीचे असे अर्धा डझन गुन्हे दाखल आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास विद्यार्थिनी तिच्या खाजगी क्लासेसला जात असताना दोन मुलांनी विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिच्या गळ्यातील 8 ग्रॅमची सोन्याची चेन बळजबरीने हिसकावून धक्का देऊन त्याठिकाणाहून पळ काढला. घटनेनंतर विद्यार्थिनीने घटनेची संपूर्ण माहिती तिच्या आईला सांगितली. आईच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलिसांनी दोन्ही दरोडेखोरांविरुद्ध कलम ३९२ (दरोड्याचे कलम) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

पोलिस निरीक्षक गुन्हे नीलिमा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गोरेगाव पोलिस ठाण्याच्या तपास पथकातील पोलिस निरीक्षक शिवाजी जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन पाटील आणि पोलीस हवालदार सावंत, वारंगे, शेख, पाटील, चव्हाण यांनी संयुक्तपणे घटनास्थळाच्या आजूबाजूचे 30 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजमध्ये आरोपीची ओळख पटल्या नंतर सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी घटनास्थळी दुचाकीवरून विद्यार्थिनीचा पाठलाग करताना दिसून आले. आरोपीची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या तांत्रिक माहितीच्या मदतीने आरोपींना 23 फेब्रुवारीच्या रात्री गोरेगाव परिसरातून अटक करून न्यायालयात हजर केले असता, आरोपींना 27 फेब्रुवारीपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

जनेंद्र नरसिंगराव कोया उर्फ ​​जानी (22) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो मिठानगर गोरेगाव मुंबई येथील रहिवासी आहे. दुसरा आरोपी ऋषिकेश प्रकाश दळवी उर्फ ​​बाबू काल्या (22) हा आंबेडकर चौक भगतसिंग नगर 2 बांगूर नगर, गोरेगाव पश्चिम येथे राहणारा आहे. तपासात असे आढळून आले की, दोन्ही आरोपी हे मोठे गुन्हेगार असून त्यांच्यावर दहिसर पोलीस ठाणे आणि बांगूर नगर पोलीस ठाण्यासह इतर ठिकाणी घरफोडीचे अर्धा डझनहून अधिक गुन्हे दाखल आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com