रोहित पवार ईडीच्या रडारवर; 'ग्रीन एकर'च्या चौकशीचे आदेश
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे. रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर कंपनीचे प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश ईडीने दिल्याची माहिती समजत आहे.
महाराष्ट्रात सत्तातंर झाल्यानंतर रोहित पवार हे राजकीय घडामोडींवर नेहमीच आपलं रोखठोक मत मांडत होते. यादरम्यान भाजप नेते मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादीचा आणखी एक नेता तुरुंगात जाणार असल्याचे ट्विट केले होते. कंबोज यांचा रोख विरोधी पक्षनेते अजित पवांराकडे असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. परंतु, आता कंबोज यांनी रोहित पवार यांना लक्ष्य केले आहे. अशातच ईडीकडून रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर कंपनीची प्राथमिक चौकशी करण्यात येत आहे. रोहित पवार यांच्यासह बँक घोटाळ्या प्रकरणी अटकेत असलेले राकेश वाधवान हे देखील कंपनीच्या संचालकपदी होते.
याच पार्श्वभूमीवर मोहित कंबोज यांनी ट्विट केले आहे. लगाम दिसत नाही पण जिभेवर असावा, आमच्याशी पंगा घेताल तर तयार राहा, हा फक्त ट्रेलर होता, अजून पूर्ण पिक्चर बाकी आहे, असा इशारा त्यांनी रोहित पवारांना दिला होता. याआधीही बारामती अॅग्रो लिमिटेड स्टार्ट अपसाठी केस स्टडी सुरू असल्याचे त्यांनी ट्विटरवरुन सांगितले होते.
काय आहे प्रकरण?
काही दिवसांपूर्वी ईडीला तक्रार मिळाली होती. यामध्ये रोहित पवार यांचे राकेश वाधवान यांच्याशी जवळचे संबंध असून त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. २००६ ते २०१२ या कालावधीत रोहित पवार यांनी ग्रीन एकर रिसॉर्ट आणि रिअल टच प्रा. लिमिटेडचे संचालक होते. त्यात त्यांनी गुंतवणूक केली होती. त्यात रोहित पवार यांच्यासह चार लोकांची नावं होती. लखविंदर दयालसिंग, धोंडूराम जैदर, अरविंद परशूराम पटेल हे आहेत. यापैकी लखविंदर दयालसिंग हे राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांचे अत्यंत जवळचे आहेत. लखविंदर हे एचडीआयएल, हार्मनी मॉल्ससह ११ ते १२ कंपनीमध्ये राकेश वाधवान यांच्यासोबत पार्टनर होते. ग्रीन एकर्स प्रा.लि. कंपनीमुळे रोहित पवार आणि लखविंदर यांचे संबंध होते. या कंपनीच्या माध्यमातून मोठी रक्कम देशाबाहेर पाठविण्यात आली, तसेच देशात आली, याची चौकशी व्हावी, अशी तक्रार ईडीला प्राप्त झाली होती. या तक्रारीवरुन ईडीकडून चौकशी करण्यात येत असून प्राथमिक तपास सुरू झाला आहे.