Rohit Pawar : इंडिया आघाडीतील पक्षांनी आपापले इगो बाजूला सारले नाहीत, अशक्य असणारी विजयश्री भाजपाने खेचून आणली
दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडलं. दिल्ली विधानसभेसाठी 699 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दिल्लीतल्या 70 विधानसभा क्षेत्रांमध्ये 13,766 मतदान केंद्रांवर मतदान पार पडलं असून आज 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.
मतमोजणीला सुरुवात झाली असून भाजप आघाडीवर दिसत असून भाजपाने दिल्लीत जोरदार मुसंडी मारली आहे. कलांनुसार भाजपला बहुमत मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. यातच काँग्रेसला एका जागेवर आघाडी मिळाली आहे. दिल्लीत काँग्रेस पुन्हा एकदा पराभवाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. आपचे अनेक दिग्गज पिछाडीवर दिसत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांनी ट्विट केलं आहे. रोहित पवार म्हणाले की, दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल भाजपचे अभिनंदन! १५ हून अधिक ठिकाणी भाजपच्या विजयी उमेदवारांचे मताधिक्य तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराने मिळवलेल्या मतापेक्षा खूप कमी आहे. ही सर्व आकडेवारी बघितली असता INDIA आघाडी असती तर भाजपा २० जागांच्या वर देखील गेली नसती.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, दिल्ली निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या नेतृत्वात सरकार स्थापन व्हावे ही माझी व्यक्तिगत भावना होती. उचित-अनुचित अशा सर्व मार्गांचा वापर करून निवडणुका लढणाऱ्या भाजपासारख्या #महाशक्ती विरोधात लढताना समान विचारधारा असलेल्या पक्षांनी एक-दोन पाऊल मागे-पुढे घेण्याची गरज होती, परंतु दुर्दैवाने इंडिया आघाडीतील पक्षांनी आपापले इगो बाजूला सारले नाहीत, परिणामी अशक्य असणारी विजयश्री भाजपाने खेचून आणली. ही बाब ट्रॅडिशनल पद्धतीने लढणाऱ्या सर्व नेत्यांनी लक्षात घ्यायला हवी. असे रोहित पवार म्हणाले.