मोदींसारखा ‘सुपरमॅन’ पंतप्रधान आपल्याला लाभला असताना...; सामनातून टीका

मोदींसारखा ‘सुपरमॅन’ पंतप्रधान आपल्याला लाभला असताना...; सामनातून टीका

ठाकरे गटाचा अग्रलेख सामनातून चीनच्या घुसखोरीवरून पंतप्रधान मोदी व भाजपावर सडकून टीका करण्यात आली.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

ठाकरे गटाचा अग्रलेख सामनातून चीनच्या घुसखोरीवरून पंतप्रधान मोदी व भाजपावर सडकून टीका करण्यात आली. सामनातून म्हटले आहे की, चीनने ‘लडाखमध्ये घुसखोरी केलीच आहे आणि अनेकदा चीनच्या नकाशात अरुणाचल प्रदेश दाखवून आपल्याला डिवचले जाते. मोदींसारखा ‘सुपरमॅन’ पंतप्रधान आपल्याला लाभला असताना चीनने हिंदुस्थानच्या बाबतीत अशी वाकडी पावले टाकावीत हे मोदी भक्तांना मान्य होणार नाही. लडाखच्या भूमीवर राहुल गांधी आहेत. त्यांनी चिनी घुसखोरीचे सत्य मांडले. भाजपास ते मान्य नसेल तर नेमके सत्य काय ते त्यांनी पुराव्यासह मांडावे. पंतप्रधान मोदी यांनी चिनी राष्ट्राध्यक्षांना अहमदाबादेत आणून कितीही ‘झोके’ दिले तरी ‘भाई भाई’ किंवा ‘मैत्री’ अशा भाकड कथांवर चीन विश्वास ठेवत नाही.

१९६२ मधल्या आपल्या राष्ट्रीय मानहानीचा गुन्हा कुणाच्या हातून घडला हे जाणून घेण्याचा अधिकार भाजपास आहेच, पण मग ५ मे २०२० रोजी मोदी काळात चीन लडाखमधून किती आत आपल्या हद्दीत घुसला आणि त्याने नक्की काय बळकावले, देशाचे संरक्षण खाते तेव्हा काय करीत होते. हिंदी चिनी भाई भाई’ला भाजपाचा विरोध तकलादू आहे. कारण मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी चीनबरोबरचे संबंध सुधारायला हवेत यावर भर दिला. चीनच्या राष्ट्राध्यक्षांना ते वरचेवर अहमदाबादला बोलावून शेव, ढोकळा, खाकरा यांची मेजवानी देतात. मोदींबरोबर चिनी राष्ट्रपती झोपाळ्यावर बसून मौज करतात. ‘हिंदी चिनी भाई भाई’ हा नेहरूंचा संदेश मोदींनी मान्य केल्याचेच हे लक्षण मानायला हवे. चीनने घुसखोरी केली म्हणून हिंदुस्थानी सैन्यास चीनवर सर्जिकल स्ट्राईक करण्याचे आदेश मोदी यांनी दिलेले नाहीत.

भाजपावाले नेहमीप्रमाणे भूतकाळाच्या अंधाऱ्या गुहेत शिरत आहेत. पंतप्रधान मोदींची ५६ इंचाची छाती असताना चीन आत घुसला आणि त्याने आपल्या अनेक ‘चौक्या ताब्यात घेतल्या. भाजपाच्या मते राहुल गांधी हे देशाचा अपमान करीत आहेत. चीनने घुसखोरी केली काय? असा प्रश्न विचारल्याने देशाचा कोणता आणि कसा अपमान झाला? हे भाजपा प्रवक्त्यांना सांगता येईल काय? असे सामनातून म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com