महागाईवर नेहमीप्रमाणे ‘ मौनीबाबा ‘ बनून राहायचे; सामनातून केंद्र सरकारवर निशाणा

महागाईवर नेहमीप्रमाणे ‘ मौनीबाबा ‘ बनून राहायचे; सामनातून केंद्र सरकारवर निशाणा

देशात महागाईचा वाढता आलेख आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

देशात महागाईचा वाढता आलेख आहे. महागाईमुळे सामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसली आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचा अग्रलेख सामनातून जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.

सामनातून म्हटले आहे की, टोमॅटोचे भाव प्रति किलो दीडशे-दोनशे रुपयांच्या खाली यायला तयार नाहीत. नवीन टोमॅटोचे पीक बाजारात येईपर्यंत या स्थितीत बदल होऊ शकत नाही. देशात सध्या सर्वच प्रकारच्या महागाईने टोक गाठले आहे. त्यात धान्य, डाळी आणि साखरेच्या टंचाईच्या भीतीची भर पडली आहे. अर्थात, या परिस्थितीची केंद्रातील मोदी सरकारला कितपत जाणीव आहे, हा प्रश्नच आहे. हे सरकार फक्त विरोधी पक्षांच्या फोडाफोडीत, केंद्रीय तपास यंत्रणांचा दहशतवाद माजविण्यात आणि निवडणुकीच्या राजकारणातच मग्न आहे. म्हणूनच काही महिन्यांपासून महागाईचा आलेख चढता असूनही सरकार ढिम्मच आहे.

अन्नधान्य, कडधान्य, भाजीपाला, फळे आणि साखरेसह इतर पिकांचे उत्पादन निसर्गावर अवलंबून आहे, हे खरेच आहे. तथापि, त्याच्या उत्पादनातील तुटीची झळ देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि सामान्य जनतेला कमीतकमी कशी बसेल याचा मार्ग केंद्रातील सरकारने काढायचा असतो . मात्र नेमके येथेच घोडे पेंड खाते आहे.

एकीकडे देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर आल्याचे सांगत स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घ्यायची आणि भयंकर महागाईवर नेहमीप्रमाणे ‘ मौनीबाबा ‘ बनून राहायचे . आधीच महागाईचा भार त्यात साखर , धान्य आणि डाळींच्या टंचाईचा मार अशा कोंडीत देशातील जनता सापडण्याची भीती आहे . अर्थात केंद्रातील सत्तापक्षाला त्याची फिकीर कुठे आहे? असे म्हणत सामनातून हल्लाबोल करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com